जटवाडा रोडवर पाणीबाणी...! एमआयएम नगरसेवकाच्या कार्यालयावर हंडा मोर्चा...
जटवाडा रोडवर पाणीबाणी...! एमआयएम नगरसेवकाच्या कार्यालयावर महिलांचा हंडा मोर्चा...
एका महिन्यात पाणीपुरवठा न झाल्यास महापौर व आयुक्तांना घेराव घालण्याचा युनुस पटेल यांचा इशारा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25 (डी-24 न्यूज) : ऐतिहासिक हर्सूल तलावातील पाणीसाठा आटल्याने तसेच जटवाडा रोड परिसरातील बोअरवेलची पाणीपातळी खालावल्याने प्रभाग क्रमांक १ मधील अनेक वस्त्यांमध्ये आतापासूनच पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असून, महिलांचा त्रास वाढला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी परिसरातील महिलांनी एमआयएमचे नगरसेवक अशोक हिवराळे यांच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढत महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
नवीन जलवाहिनीचे काम रखडले; टँकरच्या दरात मनमानी
जटवाडा रोड परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये अद्याप नवीन पाणीपुरवठा पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू झालेले नाही. काही ठिकाणी पाइपलाइन टाकण्यात आली असली, तरी नळाला पाणी येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. तसेच, पाणीपट्टी भरल्यानंतरच नळजोडणी घ्या, अशी भूमिका महापालिका प्रशासनाकडून घेतली जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला.
उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाण्याच्या टँकरसाठी 800 ते 1 हजार रुपये मोजावे लागत आहेत. एवढे पैसे देऊनही वेळेवर पाणी मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. टँकरद्वारे मनमानी दराने पाण्याची विक्री होत असताना त्यावर महापालिका प्रशासनाचे नियंत्रण नसल्याची नाराजी महिलांनी व्यक्त केली.
गेल्या अनेक वर्षांपासून जारच्या पाण्यावर तहान भागवावी लागत असून, नागरिकांना केवळ आश्वासनेच मिळत आहेत. प्रत्यक्षात पाणी कधी मिळणार, असा सवाल महिलांनी नगरसेवक अशोक हिवराळे आणि युनुस पटेल यांच्याकडे उपस्थित केला.
आठवडाभरात जलवाहिनीच्या कामाचे उद्घाटन
महिलांच्या तक्रारींवर उत्तर देताना नगरसेवक अशोक हिवराळे यांनी सांगितले की, पाण्याची मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या दूर करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि स्थानिक नागरिकांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. येत्या आठवडाभरात जलवाहिनीच्या कामाचे उद्घाटन करण्यात येईल.
डिसेंबरअखेरपर्यंत प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व नागरिकांना मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी चारही नगरसेवक प्रयत्नशील आहेत. तसेच, नागरिकांनी गुंठेवारी आणि मालमत्ता कर भरण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही हिवराळे यांनी केले.
महिनाभरात पाणी न मिळाल्यास महापालिकेवर भव्य मोर्चा
युनुस पटेल यांनी महिलांना आश्वासन देताना, येत्या एका महिन्यात महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठा सुरू केला नाही, तर महापालिकेवर भव्य हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा दिला. तसेच महापौर आणि महापालिका आयुक्तांना घेराव घालण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अनेक वस्त्यांतील महिलांचा सहभाग
हितोपदेश गृहनिर्माण संस्था, राधास्वामी कॉलनी, सारा वैभव, राजनगर, सईदा कॉलनी, केजीएन पार्क, हुनाजी नगर आणि जटवाडा रोड परिसरातील महिलांनी आक्रमक भूमिका घेत हंडा मोर्चा काढला. परिसरातील नागरिकांना तातडीने नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे महापौरांकडे करण्यात आली.
या निवेदनावर रामदास गाडेकर, मधुकर पवार, पी. के. बोर्डे, पुंडलिक भालेराव, भास्कर वाहुळ, यश मानकर, संतोष भालेराव, पुष्पा गायकवाड, सुशीला गायकवाड, विद्या जाधव, मंगला आधाने, शितल झाला, मंदा गाडेकर, सुशीला दाभाडे, सविता चौधरी, अनिता तुपकर, सरलाबाई काळे, सुरेखा तांगडे, रेखा गायकवाड, शारदा गुंजाळ, लता आहेर, नंदा जोशी, सोनाबाई दांडगे, पुष्पा सुरडकर, निर्मला पवार, कमलाबाई भालेराव, पुष्पाताई नलावडे, सुमन राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांना डिसेंबरअखेरपर्यंत मुबलक पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात नियमित पाणीपुरवठा कधी सुरू होणार, याकडे आता परिसरातील नागरि
कांचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?