शहरात 31.65 एमडी ड्रग्स व नशेच्या गोळ्यासह एक आरोपी जेरबंद

 0
शहरात 31.65 एमडी ड्रग्स व नशेच्या गोळ्यासह एक आरोपी जेरबंद

31.65 ग्रॅम एमडीसह नशेच्या गोळ्या जप्त; 2 लाख 10 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17 (डि-24 न्यूज) : शहरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 31.65 ग्रॅम एमडी पावडर, नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या नायट्राझेपाम (Nitrosun-10) औषधांच्या 10 गोळ्या, मोबाईल आणि होंडा स्कूटी असा एकूण 2 लाख 10 हजार 950 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अनिल गुलाबसिंग सूर्यवंशी (वय 53) याच्याविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 17 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 7.30 वाजता अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, अनिल सूर्यवंशी हा छत्रपती संभाजीनगर येथील बुढीलेन परिसरात श्री. लोधेश्वर महादेव मंदिराजवळ, प्रकाश मांजा मेकर दुकानाजवळ स्कूटीवरून एमडी पावडर आणि नशेच्या गोळ्यांची बेकायदेशीरपणे विक्री करीत आहे.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचून छापा टाकला. यावेळी 94 हजार 950 रुपये किमतीची एमडी पावडर, 36 हजार रुपये किमतीच्या नायट्राझेपाम टॅब्लेट्स आयपी (Nitrosun-10) या नशेच्या 10 गोळ्या, मोबाईल आणि होंडा स्कूटी (क्रमांक MH20EM7862) असा एकूण 2 लाख 10 हजार 950 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणातील आरोपी अनिल गुलाबसिंग सूर्यवंशी (वय 53, रा. घर क्रमांक 1-14-100, प्रकाश पतंग मार्ट, श्री. लोधेश्वर महादेव मंदिराजवळ, बुढीलाइन, छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील कारवाई

 पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, प्रभारी पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती पूनम पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (शहर विभाग) सागर देशमुख तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, पोलीस उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे, पोलीस हवालदार नारायण पायघन, पोलीस हवालदार भावसिंग चव्हाण, पोलीस अंमलदार सतीश जाधव, पोलीस अंमलदार विशाल मेटे, पोलीस अंमलदार नितेश सुंदरडे, पोलीस अंमलदार सरताज पठाण आणि पोलीस अंमलदार विठ्ठल पवार यांचा समावेश होता.

तसेच औषधी निरीक्षक मनोज पैठणे, रासायनिक विश्लेषक प्रीती क्षीरसागर व त्यांच्या टीमनेही या कारवाईत सहभाग घेतला.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

शहरात कुठेही अमली पदार्थांची विक्री होत असल्यास किंवा कोणी अमली पदार्थांचे सेवन करीत असल्यास, तसेच नशा करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्यास नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी. यासाठी 9684702002 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे संदेश पाठवून माहिती देता येईल, असे आवाहन अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow