अशी पार पडणार पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया...
अशी पार पडणार पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया...
70 टेबलांवर प्राथमिक मतमोजणीच्या 13 फेऱ्या; सकाळी 8 वाजता प्रारंभ
प्रथम मतपत्रिकांची मोजणी, त्यानंतर पसंतीक्रमानुसार मतांची गणना
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 26 (डि-24 न्यूज) : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या, मंगळवार, दि. 27 ऑक्टोबर रोजी चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील रेसोनेट लॉजिस्टिक्स एलएलपी येथे होणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. प्राथमिक मतमोजणीसाठी 70 टेबलांवर 13 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
या निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबर रोजी विभागातील आठ जिल्ह्यांमधील 842 मतदान केंद्रांवर मतदान झाले. प्राथमिक आकडेवारीनुसार 1 लाख 91 हजार 689 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, मतदानाची टक्केवारी 58.67 आहे. निवडणुकीत एकूण 41 उमेदवार रिंगणात आहेत.
मतमोजणीची सुरुवात कशी होणार?
मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी सकाळी 7 ते 7.15 या वेळेत मतमोजणी कक्षात उपस्थित राहतील. सकाळी 7.30 वाजता उमेदवार किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम उघडण्यात येईल. त्यानंतर मतपेट्यांचे टेबलनिहाय वितरण होईल. सकाळी 8 वाजता गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होईल. त्याच वेळी टपाली मतपत्रिकांची मोजणीही सुरू करण्यात येईल.
प्रथम मतपत्रिकांचे गठ्ठे तयार होणार
प्रत्येक मतपेटीवरील सील तपासून ती उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष उघडली जाईल. मतपेटीतील मतपत्रिकांची संख्या तपासून मतदान केंद्राच्या हिशेबाशी पडताळणी केली जाईल. त्यानंतर प्रत्येकी 25 मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करण्यात येतील.
सर्व मतपत्रिकांचे गठ्ठे एकत्रित करून त्यांची सरमिसळ केली जाईल. त्यानंतर प्रत्येक टेबलवर एक हजार मतपत्रिका तपशीलवार मतमोजणीसाठी दिल्या जातील. 842 मतदान केंद्रांवरील मतपेट्यांच्या प्राथमिक मोजणीसाठी 13 फेऱ्या होणार असून, तेराव्या फेरीत केवळ दोन मतदान केंद्रांतील मतपेट्यांची मोजणी होईल.
पसंतीक्रमानुसार मतांची मोजणी
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पसंतीक्रम पद्धतीने होत असल्यामुळे प्रथम प्रत्येक उमेदवाराला मिळालेल्या पहिल्या पसंतीच्या वैध मतांची मोजणी केली जाईल. त्यानंतर एकूण वैध मतांच्या आधारे निवडून येण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा निश्चित केला जाईल.
पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोणत्याही उमेदवाराने आवश्यक कोटा पूर्ण केला नाही, तर सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवाराला नियमानुसार वगळण्यात येईल. त्या उमेदवाराच्या मतपत्रिकांवरील पुढील उपलब्ध पसंतीक्रमानुसार उर्वरित उमेदवारांना मतांचे हस्तांतरण केले जाईल. आवश्यक कोटा पूर्ण होईपर्यंत किंवा नियमानुसार निर्णय होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील.
पसंतीक्रमानुसार मतांची मोजणी व हस्तांतरण करावे लागत असल्याने अंतिम निकालासाठी अतिरिक्त वेळ लागू शकतो. मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आवश्यक पडताळणी व निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अंतिम
निकाल जाहीर करण्यात येईल.
What's Your Reaction?