जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी...

 0
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी...

जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम;

पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिरात 263 जणांची तपासणी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23 (डि-24 न्यूज)- समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत जनहितासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या पत्रकारांनी आपल्या आरोग्याबाबत सजग रहावे, या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिराला आज उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. 

जिल्हा माहिती कार्यालयात आज सेवा संकल्प अभियान व लोकसंवाद उपक्रमांतर्गत या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उपसंचालक(माहिती) प्रवीण टाके, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, सह आयुक्त अन्न औषध प्रशासन दयानंद पाटील, सह आयुक्त न.प.प्रशासन सौरभ जोशी, विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष माधव सावरगावे, सहायक संचालक सुरेश पाटील, माहिती अधिकारी संजीवनी जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहणाऱ्या पत्रकारांचे दैनंदिन जीवन धावपळीचे असते. या व्यस्ततेतही त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे आणि नियमित आरोग्य तपासणी करावी, या भूमिकेतून उपसंचालक प्रवीण टाके व जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ यांच्या सहकार्याने पत्रकारांच्या विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या तसेच आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हा मराठी पत्रकार संघ, मालक-संपादक महासंघ, व्हॉईस ऑफ मीडिया, व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग, एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशन, ऊर्दू प्रेस रिपोर्टर असो. यांसह विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. एकून 263 पत्रकारांनी शिबिरात आरोग्य तपासणी करून घेतली. पत्रकार बांधव व भगिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शिबिराला व्यापक प्रतिसाद लाभला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow