चांगल्या कामातून करा विभागाचे प्रतिमा संवर्धन - विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

महसूल सप्ताह समारोप
चांगल्या कामातून करा विभागाचे प्रतिमा
संवर्धन- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर
स्वतःचे ज्ञान अद्यावत करुन लोकांना सेवा द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8 (डि-24 न्यूज) – लोकांना सेवा देणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. विभागाचे म्हणून काही विषय आहेत. याबाबत शासनस्तरावर धोरणात्मक निर्णय वेळोवेळी होत असतात. हे निर्णय विभागाच्या आणि कर्मचारी अधिकारी यांच्या हिताचेच असतात. आपण चांगले काम करुन लोकांना सेवा द्यावी व आपल्या विभागाचे प्रतिमा संवर्धन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले.
दैनंदिन कार्यालयीन कामकाज, सेवा, कर्तव्य बजावतांना आपण आपले ज्ञान अद्यावत करत राहणे आवश्यक आहे. अद्यावत ज्ञान केल्यास आपण लोकांना चांगली सेवा देऊ शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.
महसूल सप्ताहाचा आज समारोप झाला. त्यानिमित्त एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यास विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, कुलगुरु डॉ.विलास सपकाळ, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य प्रशासकीय अधिकारी सिडको जगदीश मिणीयार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे, संगिता राठोड, संगिता सानप, एकनाथ बंगाळे, डॉ. अरुण जऱ्हाड, संतोष गोरड तसेच सर्व तहसिलदार, कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी अनिल सुर्यवंशी, परेश खोसरे, देविदास जरारे, विद्याचरण कडवकर, स्वरुप कंकाळ आदी उपस्थित होते.
कुलगुरु डॉ. सपकाळ यांनी सांगितले की, सेवा काळात वाचन आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून आपण स्वतःचे ज्ञान अद्यावत करावे. बहुविध पद्धतीची कामगिरी आपणास करणे सहज शक्य होते.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, आपल्या विभागामुळे आपल्याला ओळख नाव मिळते. प्रतिष्ठा मिळते. ती प्रतिष्ठा लोकांना चांगल्या प्रकारे सेवा देऊन आपण वाढविली पाहिजे. त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन, वाचन, आरोग्य विषयक जागरुकता राखणे आवश्यक आहे.
विभागीय आयुक्त पापळकर म्हणाले की, शासनाने आता अनेक विषयात धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. कृत्रिम वाळू धोरण हे अशाच प्रकारचे धोरण आहे. लोकांना स्वस्तात वाळू उपलब्ध करुन दिल्यास हा प्रश्न निकाली निघेल. जगाच्या प्रगतीबरोबर आपल्यालाही जुळवून घ्यावे लागेल. त्यासाठी स्वतःचे ज्ञान अद्यावत ठेवावे. विभागाची प्रतिमा उंचवावी,असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविक जनार्दन विधाते यांनी केले. यावेळी महसूल अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व महसूल कर्मचारी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
What's Your Reaction?






