संविधान अमृत महोत्सवी वर्षात "घर घर" संविधान अभियान

 0
संविधान अमृत महोत्सवी वर्षात "घर घर" संविधान अभियान

संविधान अमृत महोत्सवी वर्षात ‘घर घर संविधान’ अभियान_

अधिकारांसोबत कर्तव्यांबाबतही जागरुक रहावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.26(डि-24 न्यूज)- भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सन २०२४-२५ या वर्षात ‘ घर घर संविधान’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. आज यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान उद्देशिकेचे सामुहीक वाचन करण्यात आले. प्रत्येक भारतीयाने संविधानाबाबत आदर बाळगावा व संविधानाने आपल्याला दिलेल्या अधिकारांसोबत कर्तव्यांबाबत जागरुक राहून कर्तव्य पालनही करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात हा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, डॉ. सुचिता शिंदे, डॉ. व्यंकट राठोड, एकनाथ बंगाळे आदी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखाप्रमुख व अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, भारतीय राज्यघटना ही अथक परिश्रम आणि सखोल अभ्यासाअंती तयार करण्यात आलेला एक दस्तऐवज आहे. या संविधानाद्वारे आपल्या देशाचा कारभार चालतो. या संविधानाने दिलेल्या समानता, बंधुता, सगळ्यांना संधीची समानता, स्वातंत्र्य अशा विविध मुलभूत अधिकारांमुळे आपले जीवन अधिक समृद्ध होत आहे. त्यामुळे आपण सगळ्यानी संविधानाप्रती कृतज्ञ असले पाहिजे. संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करतांना आपण आपल्या कर्तव्यांप्रतीही जागरुक असले पाहिजे,असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

प्रारंभी संगिता राठोड यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश कथन केला. सामुहिकरित्या संविधान उद्देशिकेचे वाचन झाले. त्यानंतर डॉ. सुचिता शिंदे यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया सांगितली. एकनाथ बंगाळे यांनी आभार मानून समारोप केला.

असे आहे घर घर संविधान अभियान...

घर घर संविधान हे अभियान राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक, बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतीगृहे, शासकीय निवासी शाळा, शासनमान्यताप्राप्त अनुदानित, विनानुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळा, आश्रमशाळा, वसतीगृहे, ग्रामिण व नागरी स्वराज्य संस्था अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्य घटनेबाबत, घटनात्मक अधिकार, कर्तव्ये याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे. 

अभियानाचा उद्देशः-

१. संविधानाचे महत्त्व, मूल्य, अंमलबजावणी याबाबत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तसेच भावी नागरिकांमध्ये जागरुकता वाढविणे.

२. संविधानातील मुलभूत हक्क, कर्तव्ये आणि विविध तरतुदींचे शिक्षण देणे, त्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्यायाची भावना रुजविणे.

३. भारतीय संविधानातील समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही मूल्यांचा प्रचार व प्रसार करणे, त्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विविधतेतून एकता आणि समता या संकल्पनांचा विकास होईल.

४. संविधान अध्ययनानुळे आणि चर्चेद्वारे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अधिकारांची जाणीव करुन देऊन त्यांच्या जबाबदारांचे पालन करण्यासाठी प्रेरित करणे.

५. व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा प्रचार व प्रसार करुन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना बळकट करणे.

या उद्दिष्टांनुसार सन २०२४-२५ हे वर्ष संविधान अमृत महोत्सवी वर्ष असून घर घर संविधान अभियान राबविण्यात येणार आहे. 

त्यासाठी शाळा महाविद्यालये वसतिगृह यांच्या दर्शनी भागात संविधानाची उद्देशिका लावणे, शालेय परिपाठात तसेच वसतिगृह प्रार्थनेत दररोज संविधान उद्देशिकेचे वाचन विद्यार्थ्यांकडून करुन घेणे, शालेय वाचनालयात संविधानाच्या किमान पाच प्रति विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करवून देणे, भारतीय संविधानाबाबत सर्वसाधारण माहिती जसे निर्मिती, निर्मिती समिती, अनुच्छेद, विशेषता, कर्तव्ये यावर व्याख्यान आयोजित करुन माहिती देणे, विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील प्रमुख प्रकरणे, हक्क आणि कर्तव्ये यावर मार्गदर्शन करणे. कार्यशाळांद्वारे विद्यार्थ्यांना संविधानाचे तत्वज्ञान आणि मूल्य समजावून सांगणे, संविधान मुल्ये याविषयावर पथनाट्य तयार करणे, शाळा महाविद्यालयात संविधानाच्या विविध मुद्यांवर फलक, पोस्टर, प्रदर्शन आयोजित करणे, संविधान दिन कार्यक्रम आयोजित करणे, संविधानावर आधारीत निबंध लेखन, भाषण, वादविवाद, चित्रकला स्पर्धा इ. उपक्रमांचे आयोजन करणे, प्रजासत्ताक दिनी संविधानातील मुल्यांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व सादरीकरण करणे , स्थानिक स्वराज्य संस्थांनी वार्षिक ,मासिक सभा, ग्रामसभांमध्ये प्रास्ताविकेचे वाचन करावे , जिल्हानिहाय संविधान संमेलन आयोजित करण्याचे निर्देश शासन निर्णयान्वये देण्यात आले आहेत. 

संविधान कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समिती तयार करण्यात आली असून जिल्हाधिकारी हे समितीचे अध्यक्ष असून निवासी उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव आहेत. या समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व मुख्याधिकारी नगरपालिका, नगरपंचायत, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, महिला व बालविकास अधिकारी जिल्हा परिषद, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण हे सदस्य असतील. जिल्हास्तरीय समिती ही वार्षिक योजना तयार करुन विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करेल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow