बापुनगरात रंगली नक्षत्र बुध्द पहाट, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केले होते आयोजन
बापुनगरात रंगली नक्षत्र बुद्ध पहाट
भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आयोजन
औरंगाबाद, दि.24(डि-24 न्यूज) भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या खोकडपुरा शाखेच्या वतीने बापुनगर या झोपडपट्टीत दरवर्षीप्रमाणे यंदाही कलाकारांच्या एकापेक्षा एक सरस आणि सुरेल गीतांची 'बुद्ध पहाट' बौद्ध पौर्णिमेनिमित्त रंगली. डॉ. समाधान इंगळे प्रस्तुत नक्षत्र सांस्कृतिक मंचचा बुद्ध-भीम गीतांचा आगळावेगळा कार्यक्रम संबोधी बौद्ध विहारात संपन्न झाला.
तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कार्ल मार्क्स यांच्या फोटोंना हार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात सहभागी गायक संदीप चाबुकस्वार, गायिका प्रिया पवार, अनुराधा गायकवाड, अमरजीत बाहेती, नभा इंगळे आणि उमेश इंगळे यांनी बहारदार बुद्ध व भीम गीतांचे सादरीकरण केले. याप्रसंगी ढोलक वादकवर प्रा. जितेंद्र साळवी, सिंथेसायझरवर संतोष खंडागळे, तर ऑक्टोपॅडवर संजय हिवराळे यांनी साथसंगत केली.
बापुनगर या झोपडपट्टीत यंदा कलाकारांच्या एकापेक्षा एक सरस आणि सुरेल गीतांची बुद्ध पहाटचे बौद्ध पौर्णिमेनिमित्त हे तिसरे वर्ष आहे.
'नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा' हे गीत प्रा. संदीप चाबुकस्वार यांनी गातांना वातावरण प्रसन्न झाले. 'श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी' या गीताने प्रिया पवार यांनी उपस्थितांनी ठेका धरायला भाग पाडले. 'बुद्ध देवा तुझी ज्ञानगंगा मार्ग दावी आम्हाला प्रसंगा' या गाण्यातून अमरजीत बाहेती यांनी श्रोत्यांना मुग्ध केले. 'उद्धार दिन दलितांचा करण्यासाठी भीमराव जन्मले भीमाई तव पोटी' या अनुराधा कांबळे यांच्या गीताने रंगत आणली. छोटी गायिका नभा इंगळेने सादर केलेल्या 'चांदण्याची छाया, कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया' या वामनदादांच्या गीताला श्रोत्यांनी बक्षीसांने सन्मानित केले. तर उमेश इंगळे यांनी 'भीम माझा लढे देत होता' या गीतांने चैतन्य निर्माण केले.
या वेळी कार्यक्रमाचे संयोजक शहर सचिव ॲड. अभय टाकसाळ यांनी कलाकारांचे स्वागत केले.
कार्यक्रमासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सहसचिवअनिता हिवराळे, विकास गायकवाड,
राजू हिवराळे, शाखा सचिव मनिषा भोळे, दिपाली दाभाडे, कविता गायकवाड, रफीक बक्श, शालुबाई कांबळे, अजय होर्शिल, प्रितम घनघावे, चंदाबाई आराक, बाबुलाल वाघ, अरुणा गायकवाड, चंद्रकला नावकर, कविता होर्शिल आदींसह अनेकांनी पुढाकार घेतला. या वेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
What's Your Reaction?