महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्ध, 11 लाख 18 हजार 118 मतदार...

 0
महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्ध, 11 लाख 18 हजार 118 मतदार...

महानगरपालिका निवडणूकीसाठी यादी प्रसिद्ध, 11 लाख 18 हजार 118 मतदार...!

पुरुष मतदार-5,74,933 महिला मतदार-5,43,099 तृतीयपंथी मतदार- 86

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) - आगामी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी आज प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रभागाच्या मतदार यादीची गठ्ठा पाहताच अनेक इच्छूक हक्केबक्के झाले. महापालिका प्रशासनाने ऑनलाईन मतदार याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. महानगरपालिका निवडणूकीसाठी 11 लाख 18 हजार 118 मतदार असून त्यात पुरुष मतदार 5 लाख 74 हजार 933 तर महिला मतदार 5 लाख 43 हजार 99 इतके असून तृतीयपंथी मतदार 86 असल्याचे निवडणूक विभागप्रमुख तथा उपायुक्त विकास नवाळे यांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 ही दिनांक ग्राह्य धरून महापालिकेला मतदार यादी उपलब्ध करून दिली आहे. ही मतदार यादी फुलंब्री, औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघानिहाय प्राप्त झाली असून महापालिकेच्या निवडणूकीसाठी मनपाची हद्द गृहीत धरून मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करण्यात आले आहे. 3 प्रभागासाठी एक उपायुक्त दर्जाचा अधिकारी, एका वॉर्डासाठी 4 प्रगणक, या प्रमाणे 29 प्रभागांसाठी अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्ती करून मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन करण्यात आले. साधारणपणे 30 हजार 50 हजार दरम्यान मतदार संख्या प्रभागनिहाय आलेली आहे. प्रत्येक झोन कार्यालयात मतदार यादी ठेवण्यात आली असून मनपा मुख्यालय आणि निवडणूक विभागात 1 ते 29 प्रभागाची मतदार यादी नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच मनपाच्या संकेतस्थळावर मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

महानगरपालिका निवडणूकीसाठी 29 प्रभाग असून या प्रभागांची एकत्रित मतदार संख्या 11 लाख 18 हजार 118 इतकी आहे. त्यात 5 लाख 74 हजार 933 पुरुष मतदार तर 5 लाख 43 हजार 99 महिला मतदार असून इतर म्हणजे तृतीयपंथी 86 मतदार आहेत.

प्रतीपेज 2 रुपये प्रमाणे लागणार शुल्क

प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून ही मतदार यादी ज्यांना पाहिजे त्यांना विकत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने प्रतीपेज 2 रुपये याप्रमाणे शुल्क ठरवून दिले आहे. हे शुल्क निवडणूक विभागात भरल्यानंतर मतदार यादी मिळणार आहे. साधारणपणे प्रत्येक प्रभागाची मतदार यादी ही 1500 ते 2 हजार पानांची आहे. त्यामुळे 3 ते 4 हजार रुपये भरावे लागतील. मतदार यादी देण्यासाठी चार कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

27 नोव्हेंबरपर्यंत हरकती स्विकारणार

मनपाच्या निवडणूक विभागाने आज गुरुवारी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. या मतदार यादीवर हरकती व सूचना स्विकारण्यासाठी 27 नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. नमुना अ नुसार मतदार यादीत नाव नसेल तर किंवा चुकीच्या प्रभागात नाव समाविष्ट झाले असेल तरच हरकत घेता येईल. एकगठ्ठा हरकती स्विकारल्या जाणार नाही. गृहनिर्माण सहकारी संस्थेचे अध्यक्ष, सचिव यांना हरकत नोंदवता येईल. त्यानंतर हरकतींचा पंचनामा करून त्यात बदल केले जातील.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow