दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा समारोप, नवमाध्यमांसह वाचन संस्कार रुजवावा - प्रवीण बर्दापूरकर

 0
दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा समारोप, नवमाध्यमांसह वाचन संस्कार रुजवावा - प्रवीण बर्दापूरकर

दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा समारोप...

नवमाध्यमांसह वाचन संस्कार रुजवावा- प्रवीण बर्दापुरकर

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज)- जागतिकीकरणानंतर आपल्या आकलनाचे ट्रेण्ड बदलले आहेत. वाचन हा एक संस्कार आहे तो प्रथम घरात आणि नंतर शाळेतून व्हावयास हवा. नव्या तंत्र बदलांमुळे ग्रंथालयांच्या स्वरुपाबाबत विचार व्हावयास हवा आणि नवमाध्यमांसह वाचन संस्कार नव्या पिढीत रुजवावयास हवा,असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापुरकर यांनी आज केले.

 दोन दिवसीय जिल्हा ग्रंथोत्सवाच्या समारोप प्रसंगी श्री. बर्दापुरकर बोलत होते. विधान परिषद सदस्य आ. विक्रम काळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. डॉ. रा. शं.बालेकर, राजेंद्र वाणी, डॉ. विष्णू सुरासे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, कुंडलिक अतकरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे यावेळी उपस्थित होते.

 श्री. बर्दापूकर म्हणाले की, एकूणच ज्ञानसंवर्धनासाठीची परिस्थिती सध्या कठीण आहे. बंद पडलेल्या ग्रंथालयांची संख़्या वाढत आहे. जागतिकीकरणामुळे आपल्या आकलनाचे ट्रेण्ड बदलले आहेत. लोक आता ई पेपरवर वर्तमानपत्र वाचू लागले आहेत. साहजिकच नव्या माध्यमांचा प्रभाव व उपलब्धता वाढत आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचा आराखडा तयार केला होता त्यात वाचनसंस्कृतीच्या जोपासनेचा समावेश होता. आता नव्या तंत्रज्ञानाचा विचार करुन ह्या सांस्कृतिक आराखड्याचा विकास होणे गरजेचे आहे. तसेच नव्या माध्यमांसह नव्या पिढीत वाचनाचा संस्कार रुजविणे आवश्यक आहे,असे त्यांनी सांगितले.

 आ. विक्रम काळे यांनी ग्रंथोत्सवाच्या चळवळीस बळ मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. ते म्हणाले की. ग्रंथोत्सवाच्या वेळापत्रकाबाबतही फेरविचार व्हावयास हवा, जेणेकरुन अधिकाधिक लोक त्याचा लाभ घेऊ शकतील. ग्रंथालयांचा वाचन संस्कृती जोपासण्यात मोठा सहभाग असून ग्रंथालयांच्या विविध समस्या सोडविण्यास आपण प्रयत्नशिल आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow