शिक्षणावर भर दिला तरच समाजाची प्रगती - महापालिका आयुक्त अमोल येडगे

 0
शिक्षणावर भर दिला तरच समाजाची प्रगती - महापालिका आयुक्त अमोल येडगे

शिक्षणावर भर दिला तरच समाजाची प्रगती होईल – मनपा आयुक्त अमोल येडगे

छत्रपती संभाजीनगर, दि. २६ (प्रतिनिधी) – समाज आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधायची असेल तर युवकांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत ज्ञानाच्या बळावर देशाचे नाव उज्ज्वल करावे आणि सुजाण, जबाबदार नागरिक म्हणून घडावे, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी केले. ते ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. नवाब पटेल यांनी महानगरपालिका कायद्याचे उर्दू भाषांतर केलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी आयुक्त येडगे यांनी शहराच्या स्वच्छतेबाबतही नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, स्वच्छ शहर ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. महानगरपालिका शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून नागरिकांनी कचरा रस्त्यावर न टाकता कचराकुंडीतच टाकावा तसेच प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळून पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य करावे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. वसंतराव साळुंके होते. व्यासपीठावर ज्येष्ठ विधिज्ञ टी. के. प्रभाकरन, सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता अॅड. एस. एस. काजी, लिपिक ते न्यायाधीश असा प्रेरणादायी प्रवास करणारे गोरखनाथ महालकर, उर्दू साहित्य अकादमीचे अध्यक्ष हसीन अख्तर, माजी महापौर रशीद खान मामू, दैनिक हिंदूस्थानचे संपादक नायाब अन्सारी, कन्नडच्या नगराध्यक्ष फरहीन बेगम जावेद सेठ, माजी नगरसेवक मोहसीन अहमद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. नवाब पटेल यांनी आपल्या लेखन प्रवासाचा आढावा घेत सांगितले की, त्यांनी आतापर्यंत हिंदी व उर्दू भाषेत कायद्यावरील तब्बल २६ पुस्तके प्रकाशित केली असून सर्वसामान्य नागरिकांना कायद्याचे ज्ञान सुलभ भाषेत उपलब्ध करून देणे हा त्यामागील उद्देश आहे. यावेळी त्यांच्या सहा नव्या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

प्रकाशित झालेल्या पुस्तकांमध्ये महानगरपालिका अधिनियम (उर्दू भाषांतर), कानूनी विरासत, घरेलू तशद्दूद से ख्वातीन की हिफाजत, परिवार न्यायालय, कानून बराये कजात तसेच पारिवारिक विवाद एवं समाधान या पुस्तकांचा समावेश आहे. ही पुस्तके समाजातील प्रत्येक घटकासाठी मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त करत लेखक अॅड. नवाब पटेल यांचा विशेष सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच कायद्याविषयी जनजागृतीसाठी या पुस्तकांची नागरिकांनी खरेदी करून लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.

या प्रसंगी अलजजीरा पब्लिकेशन आणि मजलिस दारुल कजा व शराई खिदमात यांच्या संयुक्त विद्यमाने नीट, बारावी आणि दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जाकीर शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अॅड. जकी शेख, अॅड. सय्यद मोईन आणि अॅड. तौफीक यांनी विशेष परिश्रम घेतले. विविध क्षेत्रातील मान्यवर, वकील, विद्यार्थी व नागरिकांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

झाला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow