प्रख्यात आंबेडकरवादी हिंदी साहित्यिक कंवल भारती विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक...!

 0
प्रख्यात आंबेडकरवादी हिंदी साहित्यिक कंवल भारती विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक...!

प्रख्यात आंबेडकरवादी हिंदी साहित्यिक कंवल भारती (दिल्ली)

19 व्या अ.भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज)

दि. 21-22-23 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील आमखास मैदानावर 19 वे अ.भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन हिंदीतील प्रख्यात आंबेडकरवादी साहित्यिक, समीक्षक, अनुवादक, संपादक व विचारवंत मा. कंवल भारती यांच्या हस्ते होणार आहे. याआधीच संमेलनाध्यक्षपदी मराठीतील प्रख्यात लोकसंस्कृती अभ्यासक व इतिहासकार डॉ. अशोक राणा (यवतमाळ) यांची निवड घोषित करण्यात आली आहे. 

 आज विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी, 19 व्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष इंजि. सतिश चकोर व मुख्य निमंत्रक अ‍ॅड. धनंजय बोरडे, अ‍ॅड. के.ई. हरिदास, अ‍ॅड. अनिलकुमार बस्ते यांनी विद्रोही कार्यालयातील पत्रकार परिषदेत माहिती दिली. संमेलनाचे उद्घाटक परराज्यातील व इतर भाषांमधील साहित्यिक असणे हे विद्रोहीचे वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी डॉ. एजाज अहमद (विचारवंत, लंडन), डॉ. उमा चक्रवर्ती (दिल्ली), जयंत परमार (अहमदाबाद), डॉ. असगर वजाहत (नाटककार, दिल्ली), डॉ. गौहर रजा (शास्त्रज्ञ व लघुपटकार, दिल्ली), रहेमान अब्बास (उर्दू साहित्यिक) इत्यादी विचारवंत, साहित्यिक उद्घाटक म्हणून लाभले आहेत. बिदागी घेऊन आश्रयदात्या राजकीय नेत्यांना उद्घाटक म्हणून बोलवण्याच्या अखिल भारतीय नामक ब्राह्मणी मराठी साहित्य संमेलनाच्या लाचार कृतीच्या पार्श्वभूमीवर गेली 25 वर्षे महाराष्ट्रात विद्रोहीने नवा स्वाभिमानी सांस्कृतिक पायंडा रूजवला आहे. यंदाही दोन्ही संमेलनांची सांस्कृतिक बांधिलकाची पातळी पुन्हा एकदा उद्घाटक व कार्यक्रम पत्रिकेवरून मराठीजनांच्या समोर आलेलीच आहे.  

 यावर्षीचे विद्रोही संमेलनाचे उद्घाटक कंवल भारती यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1953 रोजी रामपूर उत्तरप्रदेश येथे दलित-शोषित समाजात झाला. ते ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत, समीक्षक, अनुवादक व संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत. दलित साहित्याची संकल्पना', दलित कवितेचा संघर्ष, धम्मपद सौरभ, कबीर एक विश्लेषण, संत रविदास एक विश्लेषण, दलित साहित्य आणि समीक्षेचा विचार, ‘मनुस्मृती प्रतिक्रांतीचे धर्मशास्त्र’, ‘दलित धर्माची संकल्पना’, ‘आंबेडकरी विचारांचे तीन अध्याय’. ‘दलित विचारातील इस्लाम', ‘डॉ. आंबेडकर एक पुनर्मूल्यांकन', ‘स्वामी अछुतानंद आणि हिंदी नवजागरण’, ‘समाजवादी आंबेडकर’, ‘राहूल सांकृत्यायन आणि डॉ. आंबेडकर’, ‘सीता एक विद्रोही स्त्री,’ जातीधर्म आणि राष्ट्र अशी 32 पेक्षा अधिक महत्वपूर्ण ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर जमा आहे. त्यांनी आंबेडकरी दृष्टिकोनातून हिंदी साहित्य जगताची व उत्तर भारतातील ब्राह्मणी संस्कृतीची चिकित्सा करणारे लेखन सातत्याने केले आहे. विद्रोही विचारवंत म्हणून त्यांची ओळख सर्वदूर पसरली आहे. 

 त्यांनी अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे इंग्रजी व पाली भाषेतून अनुवाद केले आहेत. त्यामध्ये ‘अंधकारात ज्योती (अनागरिक धम्मपालचे जीवन), वाल्मिकी वाणी, व्हिसाच्या प्रतिक्षेत आंबेडकर, ‘मेहतर समाजात सांस्कृतिक नवजागरण’, उत्तर भारतातील चांभार आणि दलित आंदोलन’, ‘धम्मचक्क पवत्तन सुत्त’, मदर इंडिया या महत्वपूर्ण 9 ग्रंथांचा समावेश होतो. ‘मूकभारत', ‘माझी जनता' या पत्रांचे अनुवाद व संपादन तसेच निवडक दलित कविता अशा 3 संपादनकृती त्यांच्या नावावर आहेत. त्यांना भीमरत्न पुरस्कार (2001) आणि डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार (1996) व हिंदी अकादमी सन्मान 2015 मिळाला आहे. त्यांच्या निवडीने विद्रोही सांस्कृतिक संमेलनात समतावादी साहित्य व संस्कृतिचा महाजागर होणार असल्याची खात्री तमाम मराठीजनांना होत असल्याचे प्रतिपादन आज 19 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत समितीने केले. याप्रसंगी विद्रोहीचे राज्य संघटक किशोर ढमाले, कार्यवाह राजानंद सुरडकर, भाऊसाहेब जाधव, मुख्य समन्वयक प्रा. भारत सिरसाट, अ‍ॅड. अनिलकुमार बस्ते, अ‍ॅड. वैशाली डोळस, उपाध्यक्ष अनंत भवरे, कार्याध्यक्ष खालिद अहमद, सविता अभ्यंकर, सहकार्याध्यक्ष डॉ. सुनिता शिंदे, डॉ. धोंडोपंत मानवतकर, मधुकर खिल्लारे, सुधाकर निसर्ग, रामदास अभ्यंकर, एकनाथ रामटेके, वजिर शेख, डॉ. विनय हातोले, या पदाधिकार्‍यांची प्रमुख उपस्थिती होती.  

इंजि. सतिश चकोर (स्वागताध्यक्ष), अ‍ॅड. धनंजय बोरडे (मुख्य निमंत्रक), प्रा. प्रतिमा परदेशी (राज्याध्यक्षा), प्रा. भारत सिरसाट (मुख्य समन्वयक), मा. के. ई. हरिदास (खजिनदार), अ‍ॅड. वैशाली डोळस (मुख्य समन्वयक), अनंत भवरे (उपाध्यक्ष

)

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow