साहित्य संमेलन विशेष लेख, साहित्य संमेलने, परंपरा आणि परिप्रेक्ष...

साहित्य संमेलन विशेष लेखः...
साहित्य संमेलने:परंपरा आणि परिप्रेक्ष...
साहित्यसंमेलनाची परंपरा आता शतकी वाटचाल करीत आहे. मात्र या परंपरेत अनेक परिप्रेक्ष या साहित्यसंमेलने आणि त्यातून निर्माण होणाऱ्या साहित्य प्रवाह, संमेलनांचे स्वरुप, त्यातून व्यक्त होणारे विषय याबाबत अनेक परिप्रेक्ष तयार होतांना दिसतात. त्याचाच धांडोळा घेतलाय ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यीक प्रशांत गौतम यांनी.
नवी दिल्ली येथे 72 वर्षापूर्वी ऑक्टोंबर महिन्यात 54 वे साहित्य संमेलन झाले होते. तेव्हा, महाराष्ट्र राज्याची निर्मितीही झाली नव्हती,आणि अ.भा.मराठी साहित्य महामंडळही अस्तित्वात नव्हते. या 54 व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरु यांनी केले होते. अध्यक्ष होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, आणि स्वागताध्यक्ष होते,काकासाहेब गाडगीळ. त्यानंतर दिल्लीत साहित्यसंमेलन होत आहे ते यंदाच. 98 व्या संमेलनासाठी उद्घाटक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी लाभले आहेत, अध्यक्षपदाचा बहुमान डॉ.ताराबाई भवाळकर यांना मिळाला आहे.तर स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्या अनुषंगाने देशाच्या राजधानीत होणाऱ्या साहित्य संमेलनास महत्व आहे.
दोन मराठी माणसं एकत्र आली की साहित्य संस्था निर्माण होतात, असे म्हणतात ते खरेच आहे. आधीच्या काळात तेच होते, आणि आताच्या काळात ही तेच आहे. यात काहीही बदल झालेला नाही. संस्था व संमेलने वर्धिष्णू असतात. वर्षानुवर्ष हा साहित्याचा प्रवाह हा अखंड सुरुच असतात. साहित्य संमेलनाची परंपरा आता शतकाकडे जाते आहे. या प्रदिर्घ कालखंडात किती तरी बदल झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी भाषेचे अस्तित्व टिकवण्यासाठी संस्था आल्या. नंतर त्यांचा विस्तार झाला. पुढील काळात याच साहित्य संस्थांचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अस्तित्वात आले. संमेलने त्या आधीही ‘ग्रंथकार संमेलन, महाराष्ट्र साहित्य संमेलन’,या नावाने भरतच होती. तेव्हा निवडणूक नव्हती.
1964 साली अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय झाला,आणि 1965 साली महामंडळाचे पहिले संमेलन हैदराबादेत समीक्षक प्रा.वा.ल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली भरले. तेव्हा पासून ही परंपरा अखंडीत आहे.
नवी दिल्लीत तर यंदाचे संमेलन 72 वर्षाने होत आहे. हे संमेलन झाले तेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मितीही झाली नव्हती. तो काळ संयुक्त महाराष्ट्र चळवळीने भारावलेला होता. दिल्लीचे संमेलन 1954 साली झाले आणि 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. आणि मराठी साहित्यात साठोत्तरी प्रवाह यायला सुरूवात झाली.
मराठवाड्याच्या संदर्भात सांगायचे तर आजपर्यंत मराठवाड्यात झालेल्या सात संमेलनाचे अध्यक्षपद मराठवाड्याबाहेरील लेखकांनी भूषवले. केवळ एका संमेलनाचे अध्यक्षपद भूमीपुत्र भारत सासणे यांनी भूषवले. अनंत काणेकर (छत्रपती संभाजीनगर), शंकर पाटील (नांदेड), व्यंकटेश माडगुळकर (अंबाजोगाई), नारायण सुर्वे (परभणी), प्रा.द.मा.मिरासदार (परळी), प्रा.रा.ग.जाधव (छत्रपती संभाजीनगर), फादर फ्रान्सिस दिब्रिटो (धाराशीव), भारत सासणे (उदगीर) असे सांगता येईल. तर मराठवाड्यातील लेखक डॉ.यू.म.पठाण (पुणे), डॉ.नागनाथ कोत्तापल्ले (चिपळून), प्रा.फ.मु.शिंदे(सासवड), लक्ष्मीकांत देशमुख (बडोदा), डॉ.श्रीपाल सबनीस (पिंपरी-चिंचवड), नरेंद्र चपळगावकर(वर्धा) येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
मराठी साहित्य संस्कृती, कशी असते हे पाहयचे असेल तर साहित्य संमेलन चळवळीचा इतिहास आणि सद्याचे वर्तमान बघायला हवे. जगात मराठी ही अशी भाषा आहे की फक्त तिचाच साहित्य संमेलनाचा उत्सव उदंड उत्साहात होत असतो. आज सर्वाधिक साहित्य संमेलने ही मराठी भाषेचीच होतात. तालुका, जिल्हा, विभाग, राज्य पातळीवर तर मोठ्या संख्येने संमेलने होतात. विश्व मराठी साहित्य संमेलन होतात; पण कायम लक्षात राहातात ती प्रतिवर्षी होणारी अ.भा.मराठी साहित्य संमेलने. ही संमेलने नव्या-जुन्या लेखकांना हक्काचे व्यासपीठ देतात, वाचकांना आपल्या आवडीचा लेखक भेटतो आणि ग्रंथ प्रदर्शनातून त्याचे आवडीचे पुस्तक मिळते. अशा ग्रंथ प्रदर्शनातून प्रकाशकांनाही फायदा होतो.
1989 साली पहिली जागतिक मराठी साहित्य परिषद मुंबईयेथे कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. नंतरच्या काळातही सातत्य राहिले. साहित्य महामंडळानेही अशा तीन चार जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. यात गाजले ते सॅन होजे व (अमेरिका), दुबई येथील संमेलन, या निमित्ताने मराठीचा झेंडा साता समुद्रापार फडकला. राज्य सरकारने प्रतिवर्षी जिल्हा व विभागीय स्तरावर मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा चांगला उपक्रम सुरू केला आहे. छोट्या व आटोपशीर संमेलनास प्रतिसादही उत्तम लाभतो. तसेच राज्य सरकारने तीन विश्व मराठी साहित्य संमेलनं आयोजित केली. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे. पुण्यात नुकत्याच झालेल्या विश्वसंमेलनात तर कोट्यावधीची आर्थिक उलाढाल झाली, विक्रमी पुस्तक विक्री झाली. म्हणून प्रत्येक रसिक, वाचकांना साहित्य संमेलनाची उत्सुकता असते, तशी देशाच्या राजधानीत होणाऱ्या संमेलनाचीही आहे.
बृहन्महाराष्ट्रातील संमेलने...
या मराठी साहित्य संमेलनास अनेक परंपरा आहेत. या 98 वर्षातील 24 संमेलनं ही महाराष्ट्रा बाहेर झालेली आहेत. बडोदे, इंदूर, ग्वाल्हेर, बेळगाव, मडगाव, हैदराबाद, कारवार, अहमदाबाद, नवी दिल्ली, भोपाळ, रायपूर(छत्तीस गड) पणजी, घुमान(पंजाब) यातील काही ठिकाणी दोन-तीन वेळा संमेलने भरली आहेत. बृहन्महाराष्ट्रात तर बडोदा येथील वाड.मय परिषद यांची संमेलन वाटचाल अमृत महोत्सवाकडे सुरू आहे. नवी दिल्ली येथील बृहन्महाराष्ट्र मंडळाचीही तेवढीच अधिवेशनं झालीत. या शिवाय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनंही एका काळात भरली होती.
परंपरेची रुजुवात...
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सुरू केलेली 1878 पासून सुरु असलेली ही परंपरा अखंडीत राहिली असती, त्यात सातत्य राहिले असते तर दिल्लीचे संमेलन हे 98 ऐवजी 147 वे ठरले असते. या प्रवाहात विविध कारणाने खंड पडला; हे मात्र खरे. स्वातंत्र्यपूर्व काळात संमेलनाचे आयोजन करणे ही साधी बाब नव्हती, त्यावर मात करीत संमेलन सातत्य राखण्याचा प्रयत्न तत्कालीन लेखक व कार्यकर्त्यांनी केला होता. तेव्हा पासूनचा आज पर्यंतचा साहित्य संमेलनाचा प्रवास फारच रंजक आहे, कसा तो आपण जाणून घेवू या!
साहित्यसंमेलनांची परंपरा...
यंदाच्या संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. ताराबाई भवाळकर या नियोजित आहेत. आयोजक पुण्यातील सरहद्द संस्था आहे. संजय नहार हे संस्थापक अध्यक्ष आहेत. सरहद्दचे कश्मीर भागात उत्तम, शैक्षणिक, सामाजिक काम आहे. याच आयोजकांनी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली घुमान येथील 88 वे साहित्य संमेलन चांगले आयोजित केले होते. नंतरच्या वर्षी बहुभाषा संमेलनही डॉ.गणेश देवी यांच्या अध्यक्षतेखाली घुमान येथेच घेतले होते. दिल्ली येथील साहित्य संमेलनाचेही तेच आयोजक आहेत.
पहिले मराठी साहित्य संमेलन 7 फेब्रुवारी 1878 या दिवशी पुण्यात न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. या संदर्भात "ज्ञानप्रकाश " या नियतकालिकात रानडे आणि लोकहितवादी(गोपाळ हरी देशमुख)यांचे संयुक्त निवेदन प्रसिध्द झाले. ग्रंथकार संमेलन भरविण्याचा प्रस्ताव आला, त्यास 50 साहित्यिकांचा पाठिंबा होता. खरे तर रानडे यांचे एकही पुस्तक नसले तरी त्यांनीच संमेलनाचे अध्यक्षपद भूषवावे, असा लोकहितवादींसह अन्य प्रतिष्ठीत लेखकांचा आग्रह होता. 24 मे 1885 या दिवशी पुण्यात दुसरे ग्रंथकार संमेलन झाले. कृष्णाशास्त्री राजवाडे हे अध्यक्ष होते. संमेलनासाठी न्या.रानडे यांनी पुढाकार घेतला होता.
तो काळ होता संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा. साल होते 1957. तत्कालीन औरंगाबाद आणि आताचे छत्रपती संभाजनगर येथे लघुनिबंधकार अनंत काणेकर यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन सरस्वती भुवन प्रशालेत झाले. मराठी साहित्यातील ऐकापेक्षा एक दिग्गज लेखक-दत्तो वामन पोतदार, कुसुमाग्रज, आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे, वसंत बापट, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अशी ग्रेट मंडळी हजर होती. यात ",संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ",असा ठराव मंजूर झाला. पु.ल.देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली इचलकरंजीत सुवर्ण महोत्सवी संमेलन झाले. कराडला जेव्हा 1975 साली आणीबाणीच्या काळात जे अ.भा.मराठी साहित्य संमेलन झाले. त्याच्या अध्यक्ष दुर्गाबाई भागवत तर स्वागताध्यक्ष यशवंतराव चव्हाण होते. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या प्रश्नाने पुण्यातील पु.भा.भावे यांच्या अध्यक्षते खालचे व कथालेखक वा.कृ.चोरघडे यांच्या अध्यक्षतेखालचे चंद्रपुर येथील संमेलन फारच गाजले होते. 1981 मध्ये 56 वे संमेलन मध्यप्रदेशात रायपूर येथे झाले. अध्यक्ष होते गंगाधर गाडगीळ. नगर येथे झालेले संमेलन उंचीवर नेणारेच होते. ऐतिहासिक कादंबरीकार ना.स.इनामदार अध्यक्ष होते. गुलजार उद्घाटक तर गिरीष कर्नाड समारोपात होते. एप्रिल 1998 मध्ये परळी वैजनाथ येथे साहित्यसंमेलन झाले. द.मा.मिरासदार हे संमेलनाचे अध्यक्ष होते. समारोपात ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखिका महाश्वेतादेवी हजर होत्या. आशा भोसले यांच्या गाण्यांची मैफल रंगली होती, अशा प्रकारे सामाजिक प्रश्नांवरही साहित्यसंमेलनातून भुमिका मांडण्यात आली आहे.
महिला अध्यक्षांची परंपरा...
शतकाकडे वाटचाल करणाऱ्या या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून महिलांना मान मिळाला तो सहा महिला साहित्यिकांना. कुसुमावती देशपांडे(ग्वाल्हेर), दुर्गा भागवत(कराड), शांताबाई शेळके(आळंदी), डॉ.विजया राजाध्यक्ष(इंदूर), डॉ.अरुणा ढेरे(वर्धा)आणि आत्ताच्या संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ.ताराबाई भवाळकर(नवी दिल्ली).
संमेलन गाजतात लक्षात राहातात ती उत्तम नियोजन, भोजन व्यवस्थेमुळे. अशा संमेलनातून ग्रंथ विक्री उदंड होते, ती संमेलने यशस्वी होतात. संमेलन म्हटले की वाद-विवाद सोबतच येतात. असे असले तरी जगभरातील मराठी भाषक संमेलनावर फार प्रेम करतो, गर्दी करतो. संमेलन येण्याची उत्सुकता साहित्यप्रेमी वाचकांना असते आणि संमेलन संपले की रिकाम्या मांडवाकडे पाहून हुरहुर वाटते, आणि काही दिवसांनी पुन्हा संमेलनाचे दिवस आनंद घेवून येतात..
लेखक- प्रशांत गौतम.
(लेखक हे साहित्यिक,ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
What's Your Reaction?






