कोरोना महामारीत मुस्लिम युवकांनी केलेल्या मानवतावादी कामाची पुस्तकात ह्रदयस्पर्शी कहाणी...
‘अनटोल्ड स्टोरीज – बीफोर कोरोना मेमोरीज फेड’ या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यात शानदार प्रकाशन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10 (डि-24 न्यूज) - 15 वी अखिल भारतीय शैक्षणिक परिषद, पुणे येथे 8 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या उद्घाटन सत्रात मराठवाड्याचे सुपुत्र व ज्येष्ठ पत्रकार सैयद रिझवानुल्ला यांच्या ‘Untold Stories – Before Corona Memories Fade’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.
या वेळी राज्यसभेच्या सदस्या फौझिया खान आणि माजी आयएएस अधिकारी व मौलाना आझाद नॅशनल उर्दू विद्यापीठ, हैद्राबादचे माजी कुलगुरू तसेच अध्यक्ष – ऑल इंडिया एज्युकेशनल मुव्हमेंट, नवी दिल्ली ख्वाजा मोहम्मद शाहिद यांच्या हस्ते पुस्तकाचे औचित्यपूर्ण प्रकाशन झाले.
कार्यक्रमास अब्दुर्रशीद (महासचिव, ऑल इंडिया एज्युकेशनल मुव्हमेंट), प्रसिद्ध इतिहास संशोधक राम पनियानी, एएमयूचे माजी प्र-उपकुलगुरू गौहर अहमद, मुनीर आबिदा इनामदार (उपाध्यक्ष, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, पुणे), तहसीन अहमद खान (अध्यक्ष – फेडरेशन ऑफ ऑल मायनॉरिटी एज्युकेशनल ऑर्गनायझेशन), डॉ. इर्तिकाज अफजल, माजी एमएलसी पाशा पटेल, तसेच डॉ. एम. ए. लाहोरी (कुलगुरू – पी.ए. इनामदार विद्यापीठ, पुणे) उपस्थित होते.
मंचावर ‘वारिसान-ए-हर्फ ओ कलम’ या पत्रकारांच्या संघटनेचे अध्यक्ष मुहम्मद वसील व त्यांची टीमही उपस्थित होती.
खालिद सैफुद्दीन यांनी पुस्तक व लेखकाचा परिचय अतिशय प्रभावी शैलीत करून कार्यक्रम अधिक संस्मरणीय केला.
कोविड काळातील अदृश्य मानवसेवेची नोंद...
या पुस्तकात कोविड-19 महामारीच्या काळात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुस्लिम युवकांनी केलेल्या मानवी सेवाकार्यांची सत्यकथा दस्तऐवजीकृत केली आहे. रुग्ण, मजूर, गरिब कुटुंबे यांच्या साहाय्यासोबतच मृतांच्या अंत्यसंस्कारापर्यंत सर्व मानवी जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या संस्थांची ही हृदयस्पर्शी कहाणी आहे.
ही कर्तृत्वकथा द्वेषाच्या लाटेसमोर मानवतेचा उभारलेला भक्कम बांध असल्याचा संदेश पुस्तकातून प्रकट होतो.
वरिष्ठ पत्रकारांची उपस्थिती...
पुणे इंटरनॅशनल सेंटर (PIC) चे माजी कार्यकारी संचालक व ‘टाइम्स ऑफ इंडिया’ तसेच ‘हिंदुस्तान टाइम्स’चे वरिष्ठ पत्रकार अभय वेद्य यांनी या प्रकाशनाचा संपूर्ण कार्यक्रम आपल्या कॅमेऱ्यात टिपून सोशल मीडियावर शेअर केला व लेखकाचे अभिनंदन केले.
हिंदुस्तानच्या सांधणाऱ्या संस्कृतीचे प्रतीक’
मास कम्युनिकेशन व जर्नालिझमचे सेवानिवृत्त प्राध्यापक आणि लेखकाचे गुरू प्रा. सुधीर गव्हाणे यांनी पुस्तकाला प्रस्तावना लिहीत, “ही केवळ पत्रकारिता नसून हिंदुस्तानच्या सामायिक संस्कृतीचे सशक्त दस्तऐवजीकरण आहे,” असे गौरवोद्गार काढले.
लेखकांचे मनोगत...
सैयद रिझवानुल्ला यांनी फौझिया खान, FAME संस्था तसेच ‘वारिसान-ए-हर्फ ओ कलम’च्या संपूर्ण टीमचे आभार मानून,
“खालेद सैफोद्दीन यांनी प्रत्येक पानावर मार्गदर्शन केले. हे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे,” असे ते म्हणाले.
What's Your Reaction?