नियमबाह्य रस्ता खोदकामाची सभापतींकडून दखल, चौकशी करुन दोषींवर कडक कारवाईचे आदेश...!
नियमबाह्य रस्ता खोदकामाची स्थायी समिती सभापतींकडून गंभीर दखल; चौकशी करून दोषींवर कडक कारवाईचे निर्देश...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज)- धनमंडी बाग (जुना बाजार) व नारळी बाग परिसरात दोन वर्षांपूर्वीच बांधण्यात आलेला सिमेंट-काँक्रीट रस्ता नियमबाह्य पद्धतीने फोडून नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यात येत असल्याबाबत स्थानिक रहिवाशांनी दि. 25 जून रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत निवेदन देऊन तक्रार केली होती. या तक्रारीची स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी तातडीने दखल घेत संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली.
पाहणीदरम्यान सार्वजनिक रस्त्याची झालेली तोडफोड तसेच उघड्या अवस्थेतील ड्रेनेजमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आले. तसेच अशा प्रकारच्या कामामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असल्याची बाबही अत्यंत गंभीर असल्याचे सभापती मकरिये यांनी नमूद केले.
याप्रकरणी कोणत्याही प्रकारची अनधिकृत कामे किंवा सार्वजनिक रस्त्यांची नियमबाह्य तोडफोड अजिबात खपवून घेतली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सभापती मकरिये यांनी व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून नियमबाह्य काम करणारे संबंधित तसेच संबंधित ठेकेदार यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
याशिवाय, परिसरातील नाल्यांची तातडीने व नियमित साफसफाई करून पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही सभापती अनिल मकरिये यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या नियमबाह्य घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
What's Your Reaction?