मोहर्रम निमित्ताने शिया-सुन्नी मुस्लिम समाजाने एकत्र येत दिला एकतेचा संदेश, यौम-ए-आशुरा शहरात शांततेत...!

 0
मोहर्रम निमित्ताने शिया-सुन्नी मुस्लिम समाजाने एकत्र येत दिला एकतेचा संदेश, यौम-ए-आशुरा शहरात शांततेत...!

मोहर्रम निमित्ताने मुस्लिम शिया सुन्नी साथ-साथ, सिटी चौक येथे सवारीयांचा समारोप व मातमी जुलूस...

मुस्लिम समाजाने शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करून प्रगतीकडे वाटचाल करावी - पोलिस आयुक्त प्रविण पवार 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) - मोहर्रम निमित्ताने आज शहरात मुस्लिम शिया-सुन्नी सिटी चौक येथील दरवर्षीप्रमाणे एकत्र येऊन एकतेचा संदेश दिला. शहरातील शहागंज येथून सवारीया एकत्र जमून जूलूस सुरू झाला. इमाम हुसेन हसन हे यादिवशी शहीद झाले होते ती आठवण म्हणून व शोक व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिया समुदायाच्या वतीने काळे कपडे परिधान करून यौम-ए-आशूरा निमित्ताने मातमी जुलूस शांततेत काढण्यात आला. सिटी चौक येथे मातम(छाती बडवणे) हा कार्यक्रम अंजुमन-ए-खादिमुल मासूमीनचे अध्यक्ष सय्यद एजाज झैदी यांनी केले. मागिल 53 वर्षांपासून आलम बरदार कमिटीच्या वतीने अध्यक्ष रशीद खान मामू यांच्या देखरेखीखाली शांततेत सवारीयांचा समारोप झाला. याप्रसंगी हजारोंचा जनसमुदाय लोटला होता. याप्रसंगी हिंदू समाजातील लोकांनीही जूलूसमध्ये उपस्थित राहून एकतेचा संदेश दिला. पोलिस आयुक्त प्रविण पवार, महापालिका आयुक्त अमोल येडगे व उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना पांढरे रंगाचे फेटे बांधून रशीद खान मामू व अफसरखान यांनी स्वागत केले.

याप्रसंगी व्यासपीठावर शिया धर्मगुरु मोहम्मद अली कुम्मी व पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी सांगितले मुस्लिम समाजाच्या युवकांनी शिक्षणात व उद्योग क्षेत्रात पुढे यावे. शहराची प्रगती होत आहे वाईट सवईकडे न वळता देशाच्या प्रगतीत हातभार लावावा. 

व्यासपीठावर मनपा आयुक्त अमोल येडगे, पोलिस आयुक्त प्रविण पवार, पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख, अशोक राजपूत, पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांची उपस्थिती होती. उपस्थित अधिका-यांनी सवा-यांचे स्वागत केले. शहरात मिरवणूक शांततेत निघाली. याप्रसंगी मिरवणूक मार्गावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

कर्बला हे केवळ इस्लाम नव्हे, तर संपूर्ण मानवतेच्या रक्षणासाठीचे बलिदान – मौलाना मोहम्मद अली कुम्मी...

कर्बला येथे हजरत इमाम हुसेन यांनी दिलेले बलिदान हे केवळ इस्लामच्या रक्षणासाठी नव्हते, तर संपूर्ण मानवतेला अन्याय, अत्याचार आणि जुलूमापासून वाचविण्यासाठी होते. कर्बला आपल्याला जुलूम आणि जालिमासमोर निर्भयपणे सत्य आणि न्यायाची बाजू मांडण्याचा संदेश देते. त्यासाठी प्रसंगी आपले शीर कापले जावे लागले किंवा सर्वस्वाचा त्याग करावा लागला, तरीही हक्कासाठी संघर्ष करण्याची शिकवण कर्बला देते, असे प्रतिपादन मौलाना मोहम्मद अली कुम्मी यांनी केले.

सिटी चौक येथे अलमबरदार कमिटीच्या वतीने आयोजित अलम आणि सवारी स्वागत कार्यक्रमात उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना ते बोलत होते.

यावेळी अंजुमन-ए-खादिमुल मासूमीनचे अध्यक्ष एजाज जैदी, सचिव परवेज जाफरी, अझहर हुसेन जैदी (अज्जू लीडर), हिमायत अली जैदी, अल्ताफ भाई, डॉ. दिलशाद जैदी, सर्फराज आबेदी, वसी जैदी, जव्वाद जैदी, इन्तेसार जैदी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून कर्बलाच्या शहादतीला अभिवादन केले.

शिया समाजाची अशुरा निमित्त शांततामय मुहर्रम मिरवणूक...

अंजुमन-ए-खादिमुल मासूमीनच्या देखरेखीखाली औरंगाबादमध्ये यौम-ए-आशुराच्या निमित्ताने आयोजित शिया मातमी जुलूसमध्ये (शोक मिरवणुकीत) मोठ्या संख्येने शोककर्त्यांनी सहभाग घेतला.

या मिरवणुकीत हजारो भाविकांनी इमाम हुसैन (अ.स.) आणि कर्बलाच्या शहीदांना नौहा (शोकगीत), मातम (छाती बडवणे) आणि शांततापूर्ण स्मरणाद्वारे श्रद्धांजली वाहिली.

मिरवणुकीचे पर्यवेक्षण अंजुमन-ए-खादिमुल मासूमीनचे अध्यक्ष सय्यद एजाज झैदी यांनी केले. मुहर्रम समितीने व्यवस्था चोखपणे सांभाळली, ज्यामध्ये इन्तेसार झैदी, वसी झैदी, मुंतझिर जाफरी, रझा हुसेन काझिम, जवाद झैदी आणि इतर समिती सदस्यांनी कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

मिरवणुकीचे संपूर्ण समन्वय डॉ. दिलशाद झैदी यांनी केले, ज्यांच्या प्रयत्नांमुळे कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्धपणे आणि सुनियोजितपणे पार पडला.

पोलिस व जिल्हा प्रशासनाने पुरेसा बंदोबस्त ठेवला होता. शोककर्त्यांनी आशुराचे गांभीर्य राखत भक्ती, शिस्त आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात मिरवणूक तिच्या निश्चित मार्गावरून

शांततेत संपन्न झाली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow