राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पेपरफुटी, बेरोजगारी आणि पदवीधरांच्या प्रश्नांवर सरकारला घेरणार; महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मैदानात राहण्याचा दावा
दावा महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचा पण उबाठाचे नेते गैरहजर...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 6 (डि-24 न्यूज) – मराठवाड्यासह राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून, दुसरीकडे एमपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी तसेच आदिवासी विद्यार्थी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटनांमुळे पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, त्यांच्या भवितव्यापुढे नोकरी व रोजगाराचा प्रश्न उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज कोणताही गाजावाजा न करता दाखल केला.
डॉ. पाटील यांनी कोणतेही शक्तिप्रदर्शन किंवा गाजावाजा न करता साध्या पद्धतीने विभागीय आयुक्त कार्यालयात आपला अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी एक वाजता पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह दाखल झाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पदवीधर मतदारसंघातील विविध प्रश्नांवर भाष्य केले.
“एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे पुण्यासह विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. विविध परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. विद्यार्थ्यांसमोर नोकरी आणि रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि पदवीधरांना न्याय देण्यासाठी मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे,” असे डॉ. पाटील यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मैदानात राहण्याचा दावा
महाविकास आघाडीतील उमेदवारीबाबत बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, माजी मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार उबाठा गटाच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. त्यामुळे आपण महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात असणार असल्याचा दावा त्यांनी केला.
विद्यमान आमदारांनी पदवीधरांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवले नसल्याचा आरोपही डॉ. पाटील यांनी केला. मराठवाड्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी तसेच व्यवसाय आणि उद्योगांना चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्या आणण्याच्या दृष्टीने अपेक्षित प्रयत्न झाले नसल्याचे त्यांनी नमूद केले.
पेपरफुटीचे प्रकार बंद करण्याची मागणी
विविध स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार पेपरफुटीच्या घटना समोर येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पेपरफुटीचे प्रकार पूर्णपणे बंद झाले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना पारदर्शक पद्धतीने परीक्षा देण्याची संधी मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
“विद्यमान आमदारांविषयी पदवीधरांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे यावेळी परिवर्तन घडविण्याची संधी आहे. म्हणूनच कोणताही गाजावाजा न करता आज मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे,” अशी माहिती डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी दिली. अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी भवन येथे त्यांच्या प्रचारासाठी मेळावा घेण्यात आला.
अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीतील नेत्यांची उपस्थिती, उबाठाच्या नेत्यांची अनुपस्थिती...
डॉ. पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी मंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, काँग्रेसचे जगन्नाथ काळे, माजी आमदार चंद्रकांत दानवे, माजी आमदार गव्हाणे, माजी आमदार संजय वाघचौरे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, नरेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजीत कदम, प्रा. सलीम शेख, शेख इरफान, अखलाक देशमुख, रिझवान पटेल आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?