सरकार दुष्काळी मदतीबाबत गंभीर नसल्याने शेतकरी आत्महत्येमध्ये वाढ - काँग्रेस नेत्या रेहाना चिश्ती

 0
सरकार दुष्काळी मदतीबाबत गंभीर नसल्याने शेतकरी आत्महत्येमध्ये वाढ - काँग्रेस नेत्या रेहाना चिश्ती

सरकार दुष्काळ मदतीबाबत गंभीर नसल्याने शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ : रेहाना चिश्ती

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये, मजुरांना मदत देण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25 (डि-24 न्यूज) : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत सरकार गंभीर नसल्याने मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट या कालावधीत मराठवाड्यातील 653 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, अद्यापही हे सत्र सुरूच आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज आहे, असे मत काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्राच्या सहप्रभारी श्रीमती रेहाना चिश्ती यांनी व्यक्त केले.

गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी तसेच ब्लॉक अध्यक्षांनी दुष्काळग्रस्त गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. त्यांच्या दुःखात सहभागी होऊन शक्य ती मदत करावी, असे आवाहनही त्यांनी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही केले.

दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

दुष्काळामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, दिड महिना पुरेल एवढाच पिण्याचा साठा उपलब्ध आहे. सरकारने पाण्याचे नियोजन करावे. जनावरांच्या चारा-पाण्याचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. शेतात काम नसल्याने मजुरांना रोजगार मिळत नाही. परिणामी, अनेक मजूर कुटुंबांसह गाव सोडून स्थलांतर करत आहेत. ऊसतोड कामगार लहान मुलांना सोबत घेऊन कडक उन्हात बैलगाड्यांवरून स्थलांतर करत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

काँग्रेसच्या वतीने गेल्या अकरा दिवसांपासून मराठवाड्यात दुष्काळी दौरा सुरू आहे. या दौऱ्यात प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली असता, शेतातील सुकलेली पिके आणि शेतकऱ्यांची बिकट अवस्था पाहून मन हेलावून जाते, असे चिश्ती म्हणाल्या.

सरकारकडून जाहीर करण्यात आलेली पाच हजार रुपयांची मदतही अनेक शेतकऱ्यांपर्यंत अद्याप पोहोचलेली नाही. अशा परिस्थितीत शेतकरी दिवाळी कशी साजरी करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उद्योगपतींची कर्जे माफ केली जातात; मात्र संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळत नाही. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली.

हेक्टरी एक लाखांची मदत द्या...

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची गरज असून, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आणि मजुरांना मदतीची गरज आहे. अशी मागणी रेहाना चिश्ती यांनी केली. तसेच दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्या सुरू कराव्यात आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

शेतकरी आणि मजुरांना दिलासा देण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र, सरकार आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत असंवेदनशील असल्याचे दिसून येत आहे. संकटाच्या काळात सरकारने शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.

1 नोव्हेंबरला दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन...

निवडणूक आयोगाच्या विरोधात 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर मोठे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात देशभरातील नागरिक तसेच विरोधी पक्षांचे नेते सहभागी होणार असल्याची माहितीही रेहाना चिश्ती यांनी दिली.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या पत्रकार परिषदेला माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव डॉ. स्मिता शहापूरकर, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, इब्राहिम पठाण, जगन्नाथ काळे, इंजिनिअर शेख इफ्तेखार, मोहम्मद जाकेर, नदीम सौदागर आणि शेख अथर यांची प्रमुख उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow