अपात्र नगरसेवकांची चौकशी करण्याची आमदार अंबादास दानवे यांची मागणी...!

 0
अपात्र नगरसेवकांची चौकशी करण्याची आमदार अंबादास दानवे यांची मागणी...!

छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील काही नगरसेवकांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह; अंबादास दानवे यांची चौकशीची मागणी

मुंबई/छत्रपती संभाजीनगर, दि.2(डि-24 न्यूज)- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर निवडून आलेल्या काही विद्यमान नगरसेवकांच्या पात्रतेबाबत गंभीर आक्षेप घेत विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी नगरविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे चौकशीची मागणी केली आहे. संबंधित नगरसेवकांविरुद्ध तक्रारींची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

आमदार दानवे यांनी पाठविलेल्या निवेदनात काही नगरसेवकांबाबत विविध गंभीर बाबी निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये तीन अपत्यांसंदर्भातील लागू असलेल्या तरतुदींचे उल्लंघन, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम, गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल असणे तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील आरक्षित जागांवरून निवडून आलेल्या काही नगरसेवकांनी जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याच्या बाबींचा समावेश आहे.

या सर्व बाबी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम तसेच इतर लागू कायदे, नियम आणि शासन निर्णयांनुसार संबंधित नगरसेवकांच्या पात्रतेवर परिणाम होऊ शकतो, असे दानवे यांनी पत्रात नमूद केले आहे.

या प्रकरणाची वस्तुस्थिती पडताळून प्रत्येक बाबीची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. दोषी आढळणाऱ्या नगरसेवकांवर कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

याशिवाय नगरविकास विभागाने संबंधित प्रत्येक प्रकरणाबाबत नगरसेवकाचे नाव व प्रभाग क्रमांक, प्रकरणाचे स्वरूप व उपलब्ध अभिलेख, चौकशीची सद्यस्थिती, आतापर्यंत करण्यात आलेली कारवाई, पुढील प्रस्तावित कार्यवाहीचा कालबद्ध कार्यक्रम तसेच कोणतीही कारवाई प्रलंबित असल्यास त्यामागील कारणे यांचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करावा, अशी विनंती दानवे यांनी केली आहे.

या पत्राची प्रत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांनाही पाठविण्यात आली असून या मागणीमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow