जीन्सी पोलिसांची कारवाई, मोस्ट वाॅन्टेड अजीम पुटक जेरबंद, गावठी पिस्तूल, गांजासह 76 हजारांचा मुद्देमाल जप्त

 0
जीन्सी पोलिसांची कारवाई, मोस्ट वाॅन्टेड अजीम पुटक जेरबंद, गावठी पिस्तूल, गांजासह 76 हजारांचा मुद्देमाल जप्त

जिन्सी पोलिसांचा धडाका! मोस्ट वॉन्टेड ‘अजीम पुटक’ जेरबंद; गावठी पिस्तूल, गांजासह 76 हजारांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. (डि-24 न्यूज)- शहरातील जिन्सी पोलिसांच्या डी.बी. पथकाने मोठी कारवाई करत विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आणि दोन गुन्ह्यांत फरार असलेल्या सराईत आरोपीला अटक केली आहे. शेख अजीम शेख दाऊद उर्फ अजीम पुटक (वय 47, रा. संजयनगर, छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल, गांजासदृश पदार्थ, तीन मोबाईल, चाकू आणि चिलीम असा एकूण 76 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची धडक कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, 26 ऑक्टोबर रोजी जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश ताठे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जिन्सी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 246/2026 मधील पाहिजे असलेला आरोपी अजीम पुटक हा संजयनगर परिसरात पिस्तूलसह लपून बसला आहे.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी संजयनगर येथील गल्ली क्रमांक 10-सी परिसरात धाव घेतली. आरोपीच्या घराजवळ पोहोचल्यानंतर तो घरात नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांनी घरात शोध घेतला असता आरोपी मागील बाजूच्या बोळातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळले. शेजारी सुरू असलेल्या बांधकामाच्या पहिल्या मजल्यावर पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पिस्तूल, गांजासदृश पदार्थ आणि मोबाईल जप्त

आरोपीची अंगझडती आणि घरझडती घेतली असता पोलिसांना खालील मुद्देमाल मिळून आला.

- गावठी पिस्तूल व मॅगझीन – 50 हजार रुपये

- रेडमी कंपनीचे दोन आणि स्नेक्सियन कंपनीचा एक मोबाईल – एकूण 20 हजार रुपये

- गांजासदृश पदार्थ – अंदाजे 120 ग्रॅम, किंमत 6 हजार रुपये

- पितळी चिलीम – 500 रुपये

- लोखंडी पाते असलेला चाकू – 100 रुपये

अशा प्रकारे एकूण 76 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजासदृश पदार्थाचे स्वरूप आणि त्यासंदर्भातील पुढील तपास पोलीस करत आहेत.

आरोपीविरुद्ध 11 गुन्हे दाखल...

पोलिसांच्या माहितीनुसार, अजीम पुटक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध शरीराविरुद्ध, मालमत्तेविरुद्ध तसेच अंमली पदार्थांशी संबंधित विविध गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध एकूण 11 गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले असून, त्यापैकी दोन गुन्ह्यांत तो फरार होता.

या प्रकरणी पोलीस अंमलदार अजहर कैसर शेख यांच्या फिर्यादीवरून जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 355/2026 नुसार भारतीय शस्त्र अधिनियमातील कलम 3 व 25 तसेच एनडीपीएस कायद्यातील कलम 8(क) व 27 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज पगारे आणि जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश ताठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव सानप व जिन्सी पोलिसांच्या

पथकाने ही कारवाई केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow