नीट परीक्षा 2026 परीक्षा रद्द, पेपरफुटी प्रकरणाची सिबिआयमार्फत चौकशी, परीक्षेची नवीन तारीख जाहीर होणार...!
नीट यूजी 2026 परीक्षा रद्द; पेपरफुटी प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी...
नवी दिल्ली, दि.13(डि-24 न्यूज ) -: राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) मार्फत 3 मे रोजी घेण्यात आलेली नीट यूजी 2026 परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याच्या संशयामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. परीक्षेच्या नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसणार आहे.
पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपविण्यात आली आहे. तपासासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे, नोंदी आणि माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश एनटीएला देण्यात आले आहेत. परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचा विश्वास कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले.
एनटीएच्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांची पूर्वीची परीक्षा केंद्रे कायम राहतील. पुनर्परीक्षेसाठी नवीन प्रवेशपत्रे जारी करण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क परत केले जाणार आहे.
दरम्यान, राजस्थानमध्ये पेपरफुटीप्रकरणी विशेष कृती गटाने (SOG) कारवाई करत 13 संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात काही कोचिंग संस्थांशी संबंधित व्यक्तींचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
तपासादरम्यान असे आढळून आले की, परीक्षेतील अनेक प्रश्न परीक्षा होण्यापूर्वीच काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले होते. सिकर परिसरात हस्तलिखित अंदाजपत्रके वितरित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एका एमबीबीएस विद्यार्थ्याने आपल्या मित्राला प्रश्नसंच पाठवल्यानंतर हा प्रकार अधिक पसरल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
एनटीएने स्पष्ट केले की, परीक्षेची निष्पक्षता आणि सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी पुढील तपास पूर्ण होईपर्यंत आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील.
What's Your Reaction?