मनसेच्या पदाधिकाऱ्याचा पोलिस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला...!
पुंडलिकनगर पोलिस ठाण्यासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न...
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज) - मी दाखल केलेल्या तक्रारीची पोलिस चौकशी का करत नाहीत असा आरोप करत एका तरुणाने पुंडलिकनगर पोलिस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवार, 24 एप्रिल रोजी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यासमोर घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत अंबादास जाधव, रा. पुंडलिकनगर, गारखेडा परिसर असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. हेमंत जाधव हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव असून त्यांनी काही दिवसापूर्वी गारखेडा परिसरातील रहिवासी संजय हाडोळे यांच्या अतिक्रमणाची तक्रार महानगरपालिकेकडे केली होती. या तक्रारीचा राग मनात धरुन हेमंत जाधव यांना हरीश परिहार व त्यांचे साथीदार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन फोन करुन जीवे मरण्याची धमकी देत अडीच लाख रुपये खंडणी दे अशी मागणी करीत होते. त्याविषयी हेमंत जाधव यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु पोलिसांनी त्यांच्या तक्रार अर्जावर कारवाई केली नसल्याचा आरोप करीत हेमंत जाधव यांनी शुक्रवारी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस ठाण्याच्या परिसरात असलेल्या नागरिकांनी व कर्तव्यावरील पोलिसांनी हेमंत जाधव यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या हेमंत जाधव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु असल्याची माहिती पुंडलिगनगर पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी दिली.
What's Your Reaction?