दिनेश उर्फ बबलूचे मारेकरी सहा तासात जेरबंद, गुन्हेशाखेची कामगिरी

दिनेश उर्फ बबलूचे मारेकरी सहा तासात जेरबंद...
गुन्हेशाखा पोलिसांनी चिकलठाण्यातून केली अटक
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज)
जुन्या वादातून एका 32 वर्षीय तरुणास क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण करीत चाकूनू भोसकून त्याचा खून करणाऱ्या दोन संशयीत आरोपींना गुन्हेशाखा पोलिसांनी अवघ्या 6 तासाच्या आत चिकलठाणा परिसरातून अटक केली असल्याची माहिती गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त सुभाष भुजंग यांनी मंगळवारी, 3 डिसेंबर रोजी दिली. कुणाल उर्फ गणेश विनोद सोनवणे (28), राहणार अंबरहिल, जटवाडा परिसर आणि अनिकेत उर्फ विक्की रमेश गायकवाड (24), राहणार एकतानगर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्सूल परिसरातील चेतनानगर येथील रहिवासी दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (32) याचे सहा महिन्यापूर्वी कुणाल उर्फ गणेश सोनवणे याच्यासोबत भांडण झाले होते. त्या भांडणातूनच कुणाल उर्फ गणेश सोनवणे याने दिनेश उर्फ बबलू मोरे याला सोमवारी, 2 डिसेंबर रोजी सायंकाळी हर्सूल जेल परिसरातील मोकळ्या मैदानात बोलावले. त्या ठिकाणी कुणाल सोनवणे व त्याच्या साथीदारांनी दिनेश उर्फ बबलू मोरे याला क्रिकेटची बॅट, लोखंडी रॉड आदीने बेदम मारहाण केली. तसेच यावेळी कुणाल सोनवणे याने आपल्या जवळील धारदार चाकूने दिनेश मोरे याला भोसकले होते.
दिनेश उर्फ बबलू मोरे याची हत्या केल्यानंतर कुणाल सोनवणे व अनिकेत उर्फ विक्की गायकवाड हे दोघे चिकलठाणा मार्गे शहराबाहेर पळून जाण्याच्या बेतात असतानाच गुन्हेशाखा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक आयुक्त सुभाष भुजंग, गुन्हेशाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक काशीनाथ महाडूंळे, उपनिरीक्षक प्रविण वाघ, पोलिस अंमलदार संजय गावंडे, अश्वलिंग होनराव, विजय भानुसे, शाम आडे, कृष्णा गायके, ज्ञानेश्वर पवार, सोमनाथ डूकळे आदींच्या पथकाने केली.
मृतदेह आणला थेट पोलिस आयुक्तालयात...
मयत दिनेश उर्फ बबलू मोरे यांचे मारेकरी कुणाल उर्फ गणेश सोनवणे, अनिकेत उर्फ विक्की गायकवाड यांच्यासह इतरांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी दिनेश उर्फ बबलू मोरे याचा मृतदेह नातेवाईकांनी मंगळवार, 3 डिसेंबर रोजी पोलिस आयुक्त कार्यालयात आणला होता. पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिनेश मोरे यांच्या नातेवाईकांची भेट घेवून त्यांची समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यविधीसाठी नेला. या घटनेमुळे पोलिस आयुक्त कार्यालय परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.
What's Your Reaction?






