शहरात जूलूस-ए-मोहंमदी शांततेत, जुलूस मध्ये हजारोंचा जनसमुदाय लोटला...!

 0
शहरात जूलूस-ए-मोहंमदी शांततेत, जुलूस मध्ये हजारोंचा जनसमुदाय लोटला...!

युवा पिढीला नशेपासून वाचविण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे

जुलूस-ए-मोहम्मदीच्या मंचावरून पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांचे आवाहन; हजारो नागरिकांचा सहभाग, बालकांमध्ये उत्साह

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ), दि.26(डि-24 न्यूज)- ईद-ए-मिलादुन्नबी सणानिमित्त बुधवारी शहरात जुलूस-ए-मोहम्मदीचे आयोजन करण्यात आले. जुलूसमध्ये हजारो नागरिक, विद्यार्थी, विविध सामाजिक व धार्मिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. बालकांनी हातात झेंडे घेत मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. संपूर्ण जुलूसदरम्यान शांतता व शिस्तीचे वातावरण पाहायला मिळाले.

शहरातील नशेचा कारोबार मुळापासून संपविण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर कारवाई सुरू आहे. नशेच्या व्यवसायासह शहराचे वातावरण खराब करणाऱ्या समाजकंटकांची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी आणि युवा पिढीला या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी केले.

जुलूस-ए-मोहम्मदी व्यवस्थापन कमिटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जन्मदिनानिमित्त जुलूसचे आयोजन करण्यात आले. कमिटीचे संयोजक डॉ. शेख मुर्तुजा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

जुलूस सुरू होण्यापूर्वी निजामुद्दीन चौक येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या मंचावरून पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी नागरिकांना संबोधित केले. मागील वर्षीही याच मंचावरून नागरिकांना नशेच्या पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर शहरातील विविध भागांत कारवाई करून काही आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. मात्र, अपेक्षित प्रमाणात नागरिकांचे सहकार्य मिळाले नसल्याचे सांगत भविष्यात पोलिसांना अधिक सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

नशेच्या व्यवसायाबाबत माहिती देण्यासाठी नागरिकांनी पोलीस आयुक्तांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक 9226514001 यावर संपर्क साधावा किंवा पोलीस आयुक्त कार्यालयात येऊन निर्भयपणे तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख गुप्त ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी संयोजक डॉ. शेख मुर्तुजा यांनी जुलूस-ए-मोहम्मदीची माहिती देत नागरिकांनी अमन, शांतता व पूर्ण शिस्तीचे पालन करून जुलूसमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने कमिटीच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते जुलूसला सुरुवात करण्यात आली.

यावेळी पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख, सहायक पोलिस आयुक्त साईनाथ ठोंबरे, सिटी चौक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती निर्मला परदेशी यांच्यासह विविध पोलीस अधिकारी, तसेच कमिटीचे जबाबदार असदउल्ला तर्रार, आरेफ काजी, मजहर शुत्तारी, हामेदउल्ला खान तर्रार, डॉ. अशफाक इकबाल, नगरसेवक रशीद खान मामू, नवीन ओबेरॉय, हुसैन रजा, हाजी ईसा कुरेशी, मुश्ताक अहमद आदी उपस्थित होते.

शहरातील विविध मार्गांवरून जुलूस...

जुलूस शहागंज येथून निघून संस्थान गणपती, राजाबाजार, नवाबपुरा चौक, निजामुद्दीन चौक, चंपा चौक, शहाबाजार, चेलीपुरा, मंजूरपुरा, मोमिनपुरा, लोटा कारंजा, देवडी बाजार, कबाडीपुरा, बुढ्ढीलेन, जुनाबाजार, सिटी चौक, सराफा, गांधी पुतळा मार्गे पुन्हा निजामुद्दीन चौक येथे पोहोचला. येथे असदउल्ला खान तर्रार यांच्या दुआ व सलामनंतर जुलूसची सांगता करण्यात आली.

11 ठिकाणी ध्वजारोहण....

जुलूसदरम्यान शहरातील विविध ठिकाणी 11 ठिकाणी परचम कुशाई (ध्वजारोहण) करण्यात आले. निजामुद्दीन चौक, शहाबाजार, मंजूरपुरा, लोटा कारंजा, देवडी बाजार, कबाडीपुरा, बुढ्ढीलेन, जुनाबाजार, सिटी चौक आदी परिसरात संयोजक डॉ. शेख मुर्तुजा यांच्या हस्ते परचम कुशाई करण्यात आली.

देवडी बाजार परिसरात बोहरा समाजाच्या वतीने समाजाचे धर्मगुरू व मुकर्रम बागवाला यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने जुलूसचे स्वागत करण्यात आले. तर कबाडीपुरा परिसरात शिया समाजाच्या वतीने मुशीर हुसैन आदींच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. सिटी चौक परिसरात युवकांनी फुलांची उधळण करून जुलूसचे स्वागत केले.

ठिकठिकाणी भोजन व शरबताची व्यवस्था

ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने शहरातील विविध परिसरात, विशेषतः जुलूसच्या मार्गावर नागरिकांसाठी भोजन, शरबत, नमकीन आदींची व्यवस्था करण्यात आली होती. जुलूसदरम्यान नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होत एकमेकांना सणाच्या शुभेच्छा दिल्या. रात्री उशिरापर्यंत शहरात ईदच्या आनंदाचे वातावरण कायम होते.

आठ वर्षांपासून एकतेची परंपरा

राजाबाजार परिसरात समाजसेवक राजू पिंपळे यांच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून जुलूस-ए-मोहम्मदीच्या स्वागतासाठी मिठाईचे वाटप केले जाते. यंदाही ही परंपरा कायम ठेवण्यात आली. जुलूसच्या मार्गावर अन्नदान, पाणी वाटप, मिठाई वाटप, शितपेय व शरबत वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी राजू पिंपळे यांच्या उपक्रमाचे कौतुक करून सामाजिक एकता व बंधुभाव कायम ठेवण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल अभिनंदन केले.

एकूणच, जुलूस-ए-मोहम्मदीच्या माध्यमातून शहरात अमन, शांतता, सामाजिक एकता आणि बंधुभावाचा सं

देश देण्यात आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow