सेवन हिल अतिक्रमण निर्मूलन कारवाई, चुकीचा व्हिडिओ व्हायरल करणा-यांवर मनपा गुन्हा दाखल करणार...!
सेवन हिल अतिक्रमण निर्मूलन कारवाई: चुकीचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर मनपा गुन्हा दाखल करणार...
आयुक्त येडगे यांनी घेतला परिस्थितीचा आढावा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) - मागील आठवड्यात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत सेवन हिल ते शाहनूरमिया दर्गा चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान सेवन हिल परिसरातील फ्रान्सिलियन शाळा तसेच शासकीय कार्यालयासमोरील फुटपाथवर माठ विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यात आले. या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना तसेच वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत होता.
मात्र, या कारवाईची बदनामी करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर एक चुकीचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. सदरील व्हिडिओमध्ये एका दिव्यांग महिलेला फुटलेले माठ उचलताना दाखवून, तिचा उदरनिर्वाह माठ विक्रीवर अवलंबून होता आणि महानगरपालिकेने तिच्यावर अन्याय केल्याचा चुकीचा संदेश प्रसारित करण्यात आला.
आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त श्री. अमोल येडगे आणि अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी श्री. संतोष वाहुळे यांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी संबंधित दिव्यांग महिलेशी संवाद साधण्यात आला असता, तिचा माठ विक्री व्यवसायाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. तिचा संबंध नसतानाही तिचा वापर करून दिशाभूल करणारा व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याचे समोर आले आहे. दिव्यांग महिलेच्या बहिण व आई यांनी या चुकीच्या व्हायरल व्हिडिओ बाबत संताप देखील व्यक्त केला आहे.
सदरहू दिव्यांग महिला गजानन महाराज मंदिर परिसरात भिक्षा मागून उदरनिर्वाह करते.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महानगरपालिकेकडून सुरू करण्यात येणार आहे.
दिव्यांग महिलेला मिळणार उदरनिर्वाह भत्ता...
सदरहू दिव्यांग महिला गजानन महाराज मंदिर परिसरात भिक्षा मागून उदरनिर्वाह करते. याची नोंद घेऊन आयुक्त श्री. अमोल येडगे यांनी महानगरपालिकेतर्फे दिव्यांग नागरिकांसाठी देण्यात येणाऱ्या उदरनिर्वाह भत्ता योजनेत तिचे नाव समाविष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे संबंधित महिलेला दरमहा सुमारे साडेतीन हजार रुपयांचा भत्ता मिळणार असून तिला रस्त्यावर भीक मागण्याची गरज भासणार नाही.
What's Your Reaction?