कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा - आमदार अंबादास दानवे

 0
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा - आमदार अंबादास दानवे

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा...

शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

मुंबई / संभाजीनगर, दि.10(डि-24 न्यूज)- शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांनी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे मागणी केली आहे.

महाराष्ट्र हा देशातील सर्वात मोठा कांदा उत्पादक राज्य असून नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, पुणे, सोलापूर, बीड, धुळे यांसह अनेक जिल्ह्यांतील लाखो शेतकरी कांदा पिकावर अवलंबून असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडल्याचे दानवे यांनी पत्रात म्हटले आहे.

बियाणे, खत, औषधे, मजुरी, वीज, वाहतूक आणि साठवणूक खर्चात मोठी वाढ झाली असताना कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याचे अंबादास दानवे यांनी नमूद केले. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती केली असून कर्जफेड करणे कठीण झाले असल्याचीही खंत दानवे यानी व्यक्त केली.

नाफेडमार्फत तत्काळ कांदा खरेदी सुरू करणे, कांद्याला किमान 2000 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करणे, प्रतिक्विंटल 1500 रुपये अनुदान देणे, कांदा निर्यात कायमस्वरूपी खुली ठेवणे, खतावरील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे, कांदा चाळ उभारणीसाठी 75 टक्के अनुदान देणे तसेच दर्जेदार कांदा बियाणे अनुदानित दरात उपलब्ध करून देण्याच्या मागणी अंबादास दानवे यांनी या पत्रात केल्या आहे. 

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow