काँग्रेसला मिळणार नवीन जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष, महाराष्ट्रात संघटन सृजन अभियान सुरू...

 0
काँग्रेसला मिळणार नवीन जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष, महाराष्ट्रात संघटन सृजन अभियान सुरू...

काँग्रेसला मिळणार नवीन जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष....

कार्यकर्त्यांशी चर्चा करून 21 एप्रिलपर्यंत वरिष्ठांना देणार अहवाल...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज)- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच विविध सेलचे अध्यक्ष निवडण्यासाठी संघटन सृजन अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक ब्लॉकपर्यंत जावून कार्यकर्त्यांशी चर्चा करून अध्यक्ष कसा असावा, कोण असावा, याबाबत माहिती घेण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात आजपासून राज्यात झाली आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधून हा अहवाल तयार करून 21 एप्रिलपर्यंत वरिष्ठांना सादर करण्यात येईल, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पर्यवेक्षक तथा अलीगढ येथील माजी आमदार विवेक बन्सल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

शहागंजमधील गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खा.डॉ. कल्याण काळे, प्रदेश सरचिटणीस तथा प्रवक्ते अतुल लोंढे, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंबिरे, एड मुजाहिद खान, धनंजय चौधरी, प्रदेश पदाधिकारी तथा माजी आमदार नामदेव पवार, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष शेख युसूफ, ज्येष्ठ नेते प्रकाश मुगदिया, डॉ. सरताज पठाण, आकेफ रझवी, एड सय्यद अक्रम, इंजिनिअर इफ्तेखार शेख, अनिस पटेल, मोईन इनामदार आदींची उपस्थिती होती. यावेळी बन्सल म्हणाले की, देशभरात संघटन सृजन अभियान सुरू झाले असून, महाराष्ट्रात 27 मार्चपासून हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक यासह विविध विभागाचे जिल्हाध्यक्ष निवडण्यात येणार आहेत. यावेळी माजी मंत्री थोरात यांनीही सृजन अभियानाबाबत मनोगत व्यक्त केले.

संघटनेचा अध्यक्ष लोकांपर्यंत पोहोचल्यास संघटन मजबूत होते. मात्र विविध विभागांच्या अध्यक्ष पाहिजे तेवढ्या प्रमाणात सहभागी होत नसल्याचे दिसून आले आहे, अशी खंतही पर्यवेक्षक बन्सल यांनी व्यक्त केली. जिल्हाध्यक्षांना अधिकारासोबत जबाबदारीही दिलेली असते, याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow