गॅस माफियांच्या मुसक्या आवळल्या, 1.26 कोटींच्या मुद्देमालासह 2 मोठे टँकर जप्त...

 0
गॅस माफियांच्या मुसक्या आवळल्या, 1.26 कोटींच्या मुद्देमालासह 2 मोठे टँकर जप्त...

नियंत्रक शिधावाटप व राज्यस्तरीय दक्षता पथक, महाराष्ट्र शासन

छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस माफियांच्या मुसक्या आवळल्या; 1.26 कोटींच्या मुद्देमालासह दोन मोठे टँकर जप्त!

2,480 गरीब कुटुंबांच्या हक्काचा गॅस चोरणारे आंतरराज्य रॅकेट राज्यस्तरीय दक्षता पथकाने उघडकीस आणले.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज)- राज्यातील इंधन चोरी आणि अवैध साठेबाजी करणाऱ्या विरोधात राज्यस्तरीय दक्षता पथकाने ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबत काल एक मोठी कारवाई केली. गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवार परिसरात गॅस चोरीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले असून, यात 1 कोटी 26 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कारवाईचा थरार: रंगेहात पकडले गॅस चोर...!

नियंत्रक शिधावाटप श्री. चंद्रकांत डांगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पथक प्रमुख श्री. गणेश बेल्लाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वैजापूर रोडवरील हॉटेल साईयश जवळील मोकळ्या जागेत सापळा रचला. 2 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास एच.पी. कंपनीच्या एलपीजी टँकरचे सील तोडून अत्यंत धोकादायक पद्धतीने गॅसची चोरी सुरू असताना पथकाने धाड टाकली आणि दोन संशयितांना ताब्यात घेतले.

जप्त केलेल्या मालाचा तपशील (एका दृष्टिक्षेपात):

 दोन महाकाय टँकर: क्र. MH 43 K 5921 आणि MH 43 CK 5747 (एकूण 35,220 किलो गॅस).

सिलेंडर साठा: व्यावसायिक (19.2 किलो) आणि घरगुती (14.2 किलो) अशा एकूण 26 सिलेंडरचा अवैध साठा.

एकूण जप्त किंमत: अंदाजे 1 कोटी 26 लाख रुपये.

सर्वसामान्यांच्या हक्कावर गदा:

या कारवाईचे गांभीर्य स्पष्ट करताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, जप्त करण्यात आलेला गॅस साठा तब्बल 2,480 गरीब कुटुंबांची महिनाभराची गरज भागवू शकला असता. गॅस माफिया स्वतःच्या फायद्यासाठी सर्वसामान्यांच्या हक्काच्या इंधनाचा काळाबाजार करत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

कडक कायदेशीर पाऊले:

या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या रॅकेटचे धागेदोरे कोठपर्यंत पसरले आहेत, याचा सखोल तपास आता पोलीस यंत्रणेमार्फत केला जात आहे. वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. "अवैध साठेबाजी आणि जीवनावश्यक वस्तूंची चोरी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र केली जाईल."

> — श्री.चंद्रकांत डांगे, भाप्रसे राज्यस्तरीय दक्षता पथक प्रमुख

प्रसिद्धीसाठी निमंत्रित,

(प्रसिद्धी प्रमुख) 

राज्यस्तरीय दक्षता पथक,

नियंत्रक शिधावाटप व

एलपीजी टँकरमधून गॅस चोरी करणारी टोळी गजाआड

पुरवठा विभागाची कारवाई, 1.26 कोटींचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी

एलपीजी टँकरमधून गॅसची चोरी करणाऱ्या टोळीला जिल्हा पुरवठा विभाग आणि राज्यस्तरीय भरारी पथकाने धडक कारवाई करीत गजाआड केले. ही कारवाई गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवारात असलेल्या हॉटेल साई यशच्या पाठीमागील मोकळ्या मैदानात गुरुवार, 2 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत एलपीजी वाहतूक करणारे दोन टँकर, १७ भरलेले आणि ६ रिकामे सिलेंडर, तसेच काही घरगुती आणि ५ किलोचे छोटे सिलेंडर असा एकूण 1 कोटी 26 लाख 87 हजार 99 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टँकर चालक श्रीकृष्ण सखाराम दहिफळे, श्रीहर छेदी, मिराज मोहम्मद जैश खान, व्यवसायाचा मालक महेश विष्णू थोरात अशी आरोपींची नावे असून त्यांच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एलपीजी वाहतूक करणाऱ्या टँकरमधून अवैधरित्या गॅसची चोरी करण्यात येत असल्याची माहिती राज्यस्तरीय भरारी पथकाला मिळाली होती. अन्न नागरी पुरवठा विभागाचे संचालक चंद्रकांत डांगे, गणेश बेल्लाळे, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविण फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय भरारी पथक आणि छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप शिंदे, सागर सिंगल, हिदायत खान, इरफान पटेल, अमोल कासार, संदीप मोरे, पांचाळ, रामेश्वर लोखंडे यांच्यासह पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवारातील हॉटेल साई यशच्या पाठीमागील मोकळ्या मैदानात छापा मारला.

हॉटेल साई यशच्या पाठीमागील मैदानात एलपीजी वाहतूक करणाऱ्या टँकर क्रमांक (एमएच-43-सीके-5921) आणि (एमएच-43-सीके-5747) च्या व्हॉल्वमधून रबरी पाईपच्या सहाय्याने गॅसची चोरी करुन व्यावसायीक वापराचे आणि घरगुती वापराचे गॅस सिलेंडर भरतांना मिळून आले. भरारी पथकाने कारवाई करीत एलपीजी वाहतूक करणारे दोन टँकर, १७ भरलेले आणि ६ रिकामे सिलेंडर, तसेच काही घरगुती आणि ५ किलोचे छोटे सिलेंडर असा एकूण 1 कोटी 26 लाख 87 हजार 99 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एलपीजी वाहतूक करणाऱ्या टँकरमधून धोकादायकरित्या आणि अवैध पध्दतीने गॅसची चोरी करणाऱ्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रविण पाथरकर करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow