जिल्हा परिषदेच्या सत्तेत राष्ट्रवादी वाटेकरी, सभापती निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व...
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी अजित पवार गट व अपक्षाला सत्तेत वाटा, भाजपाचे वर्चस्व....
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) - आज झालेल्या जिल्हा परिषद विशेष समिती सभापती निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीतही भाजपाने वर्चस्व सिद्ध करत अजित पवार गट व अपक्षाला सत्तेत वाटेकरी केले आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपने बहुमताच्या जोरावर एकहाती सत्ता मिळवली. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या निवडणुकीत बहुमताचे गणित अत्यंत चतुराईने जुळवल्यामुळे सभापती पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. यामध्ये भाजपने आपल्या दोन महिला सदस्यांसह मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट आणि सचिन गरड या अपक्ष समर्थकाला संधी देऊन सत्तेचे समतोल राखला आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना आणि उबाठाचे सदस्य गैरहजर राहिले.
सभापती पदी भाजपच्या मीनाक्षी पवार आणि अनिता मोटे यांची निवड झाली आहे. तसेच, सत्तेला सुरुंग लागू नये म्हणून भाजपने शब्द दिल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे बालाजी सोनटक्के यांनाही सभापती पद दिले आहे. भाजप पुरस्कृत अपक्ष सदस्य सचिन गरड यांनाही या सत्तेत वाटा
मिळाला आहे. दुपारी दोन वाजेनंतर या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. पीठासीन अधिकारी संतोष गोरड यांनी सकाळी 10 ते 12 या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली. सकाळी 6 अर्ज वाटप करण्यात आले होते मात्र त्यापैकी फक्त चार अर्ज दाखल झाले.
महाविकास आघाडीकडून कृष्णा पाटील डोणगावकर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गीतांजली वरुण पाथ्रीकर यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले होते. मात्र, भाजपचे भक्कम संख्याबळ आणि अपक्षांची मिळालेली साथ पाहून विरोधकांनी निर्धारित वेळेत अर्ज दाखल केले नाहीत. परिणामी निवडणूक बिनविरोध झाली. पीठासीन अधिकारी यांनी सर्व सदस्यांच्या सह्या घेतल्या. त्यानंतर दाखल अर्जांपैकी मीनाक्षी पवार यांची महिला बालविकास सभापती पदी तर बालाजी सोनटक्के यांची समाज कल्याण सभापती पदी निवड झाली आहे. श्रीमती अनिता मोटे यांना आरोग्य सभापती तर सचिन गरड यांना अर्थ व बांधकाम सभापती पद मिळाले आहे.
What's Your Reaction?