जिल्ह्यात 25958 मराठा कुणबी जात प्रमाणपत्र वाटप, 10 सप्टेंबर पासून कोठे आहे जात प्रमाणपत्र शिबीर वाचा या बातमीत...!

 0
जिल्ह्यात 25958 मराठा कुणबी जात प्रमाणपत्र वाटप, 10 सप्टेंबर पासून कोठे आहे जात प्रमाणपत्र शिबीर वाचा या बातमीत...!

कुणबी मराठा जात प्रमाणपत्र...

न्या.शिंदे समिती स्थापनेपासून आतापर्यंत 25958 जणांना प्रमाणपत्रांचे वाटप...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज)- न्या. संदीप शिंदे समिती स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यात मराठा कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी जात प्रमाणपत्रांचे 25 हजार 958 जणांना वाटप करण्यात आले आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त झाली आहे. जात प्रमाणपत्रांचे वाटप व आढळलेल्या नोंदींची पाहणी करता यावी यासाठी जिल्ह्याभरात गुरुवार दि.10 पासून मंडळनिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नागरिकांना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र सुलभ, पारदर्शक आणि जलदगतीने मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत दि. 10 ते 17 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व 84 महसूल मंडळांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

नोंदींसाठी 30 लाख दस्तऐवजांची तपासणी...

जिल्ह्यात कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदींसाठी विविध शासकीय विभागांकडील दस्तऐवज तपासण्यात आले. ह्या नोंदी जुन्या, निजामकालीन, उर्दू काही मोडी लिपीतील होत्या. प्राप्त माहितीनुसार 532 गावांमधील नोंदींची तपासणी करण्यात आली. त्यात कारागृह अधीक्षकांकडे 15, भूमि अभिलेख विभागाकडे 924, मराठवाडा पुरालेख विभागाकडे 358, महसूली अभिलेख्यांमध्ये 524, शैक्षणिक अभिलेख्यांनुसार 611, मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे 2535, जन्ममृत्यू नोंदी 35 अशा एकूण 5002 नोंदी सापडल्या. 885 ग्रामपंचायतींमधील 1332 गावांपैकी 532 गावांमध्ये या नोंदी सापडल्या. या नोंदी आढळल्या असल्या तरी या नोंदींसाठी 30 लाख 8 हजार 562 नोंदी तपासण्यात आल्या. सापडलेल्या नोंदींचे स्कॅनिंग करुन जतन करण्यात आल्या आहेत.

25 हजार 958 जणांना कुणबी मराठा जातप्रमाणपत्र

 जिल्ह्यात आढळून आलेल्या कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी नोंदी या जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामपंचायत कार्यालयांच्या सूचना फलकांवरही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत म्हणजेच न्या. संदीप शिंदे समिती स्थापन झाल्यापासून 26 हजार 54 जणांना जातप्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी 25 हजार 958 अर्ज मान्य करण्यात आले असून 94 जणांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत. तालुकानिहाय मान्य केलेल्या अर्जांची संख़्या याप्रमाणे-

छत्रपती संभाजीनगर-2108, पैठण-1030, फुलंब्री-1797, वैजापूर-4831, गंगापुर-2047, सिल्लोड-2950, सोयगाव-105, कन्नड-8788, खुलताबाद-2302 असे एकूण जिल्ह्यात 25 हजार 958 जणांचे अर्ज मान्य करण्यात आले आहेत. तर 94 जणांचे अर्ज नाकारण्यात आले. दोघांचे अर्ज अद्याप प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.

हैदराबाद गॅझेटीयर नोंदीनुसार 160 जणांना प्रमाणपत्र

तसेच दि.2 सप्टेंबर 2025 च्या शासननिर्णयानुसार हैद्राबाद गॅझेटीयर मधील नोंदी विचारात घेऊन 180 जणांचे अर्ज प्राप्त झाले त्यापैकी 160 जणांचे अर्ज मान्य आले. 18 जणांचे अर्ज नाकारण्यात आले तर दोघांचे अर्ज प्रलंबित आहेत.

1142 प्रकरणांमध्ये जातवैधता प्रमाणपत्र...

तसेच न्या. शिंदे समिती स्थापन झाल्यानंतर जातवैधतेसाठी 1353 जणांचे अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 1142 जणांचे प्रकरणे वैध ठरवून त्यांना वैधता प्रमाणपत्रही देण्यात आले. 11 प्रकरणे अपात्र ठरविण्यात आले.प्रलंबित प्रकरणे 179 आहेत. 21 प्रकरणे अन्य कारणांनी निकाली काढण्यात आले आहेत.

दरम्यान गुरुवार दि.10 पासून जिल्ह्यात मंडळनिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात या नोंदी पाहणे तसेच प्रमाणपत्रासंबंधी कामकाज होणार आहे. 

शिबिरांचे वेळापत्रक याप्रमाणे-

अपर तहसिल छत्रपती संभाजीनगर- (एकूण मंडळ-5) दि.10 भावसिंगपुरा, दि.11- पंढरपूर, दि.12 कांचनवाडी, दि.15 उस्मानपुरा, दि.17– छत्रपती संभाजीनगर.

छत्रपती संभाजीनगर (एकूण मंडळ-9)- दि.10-चौका, दि.11 वरुड काझी, पिसादेवी, दि.12- शेकटा, लाडसावंगी, दि.15- चिकलठाणा, करमाड, दि.16-कचनेर, चित्तेपिंपळगाव.

पैठण (एकूण मंडळ-12)- दि.10-पाचोड, आडूळ, दि.11-आपेगाव, विहामांडवा, दि.12- पैठण, पिंपळवाडी, दि.15-बालानगर, नादर, दि.16-ढोरकीन, निलजगाव, दि.17-बिडकीन, लोहगाव.

फुलंब्री (एकूण मंडळ-5)- दि.10-आळंद, दि.11-बाबरा, दि.15-पिरबावडा, दि.16-वडोद बाजार.

खुलताबाद(एकूण मंडळ-4)- दि.10- खुलताबाद, दि.11- वेरुळ, दि.12- सुलतानपूर, दि.13- बाजारसावंगी.

कन्नड (एकूण मंडळ-10)- दि.10-नाचनवेल, चिंचोली, लिंबाजी, दि.11- देवगाव रंगारी, चापानेर, दि.12-हतनूर, चिकलठाण, दि.13-कन्नड- नागद, दि.15- करंजखेडा.

सिल्लोड (एकूण मंडळ-11)- दि.10-भराडी, बोरगाव बाजार, आमठाणा, दि.11- सिल्लोड, पालोद, निल्लोड, दि.15- अंभई, दि.16-अजिंठा, शिवना, दि.17-गोळेगाव बु., उंडणगाव.

सोयगाव (एकूण मंडळ-4)- दि.11- सोयगाव, सावळदबारा, दि.15-जरंडी, दि.16- बनोटी.

गंगापूर(एकूण मंडळ-12)- दि.10-वाळूज, तुर्काबाद, दि.11-आसेगाव, गाजगाव, दि.12- हर्सूल, डोणगाव, दि.15-सिद्धनाथ वडगाव, गंगापूर, दि.16- मांजरी, जामगाव, दि.17- भेंडाळा, शेदूरवादा.

वैजापूर(एकूण मंडळ-12)- दि.12- गारज, शिऊर, दि.11- लोणी खु., जानेफळ, दि.12- खंडाळा, बोरसर, दि.15-लासूरगाव, महालगाव, दि.16- बाबतरा, नागमठाण, दि.17-वैजापूर, घायगाव.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow