मराठवाड्यात 3 लाख 16 हजारांहून अधिक कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वाटप, 16 हजारांहून अधिक प्रकरणे निकाली - मंत्री उदय सामंत
मराठवाड्यात 3 लाख 16 हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप
जात पडताळणीची 16 हजारांहून अधिक प्रकरणे निकाली
शासनाच्या सकारात्मक कार्यवाहीची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून माहिती ;
57 लाख नोंदी जनतेसाठी संकेतस्थळावर उपलब्ध
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 9 (डि-24 न्यूज) : मराठवाड्यात कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी शासनाकडून सातत्याने कार्यवाही करण्यात येत असून, आतापर्यंत प्राप्त झालेल्या 3 लाख 17 हजार 569 अर्जांपैकी 3 लाख 16 हजार 977 नागरिकांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच जात पडताळणीसाठी प्राप्त 21 हजार 51 अर्जांपैकी 16 हजार 110 प्रकरणांमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. शासनाची कार्यवाही पारदर्शक असून, मराठा समाजाला कायदेशीर व टिकणारे आरक्षण देण्याची शासनाची सकारात्मक भूमिका असल्याची माहिती मराठी भाषा व उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज स्मार्ट सिटी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना दिली. यावेळी आमदार प्रसाद लाड उपस्थित होते.
शिंदे समिती स्थापन झाल्यानंतर मराठवाड्यात करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती देताना मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव या आठ जिल्ह्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्राच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. एकूण 3,17,569 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 3,16,977 प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. याशिवाय 2,95,305 प्रमाणपत्रे 10 टक्के आरक्षणाच्या अनुषंगाने देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जात पडताळणी प्रक्रियेबाबत माहिती देताना मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले की, मराठवाड्यात 21,051 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 16,110 प्रकरणे निकाली काढून प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. या प्रक्रियेत केवळ 64 प्रकरणे नामंजूर झाली असून, ही संख्या एकूण अर्जांच्या तुलनेत सुमारे 0.3 टक्के आहे. उर्वरित प्रकरणांवरही नियमानुसार कार्यवाही सुरू असून, नागरिकांना आवश्यक त्या प्रमाणपत्रांची पूर्तता करून देण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत.
शासनाने उपलब्ध करून दिलेल्या जुन्या अभिलेखांच्या माध्यमातूनही नागरिकांना मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत शोधण्यात आलेल्या ५७ लाख नोंदी जनतेला पाहता याव्यात यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत स्तरापर्यंत ही माहिती पोहोचविण्यासाठी तसेच नागरिकांना आवश्यक माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी 10 ते 17 सप्टेंबरदरम्यान विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
न्यायमूर्ती शिंदे समितीचा मराठवाडा दौरा 7 सप्टेंबरपासून सुरू झाला असून, या अनुषंगाने विभागातील प्रशासनाशी समन्वय साधून कार्यवाहीचा आढावा घेण्यात येत आहे. आजच्या बैठकीत उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी तसेच जात पडताळणी समितीचे प्रमुख अधिकारी सहभागी झाले होते. स्थानिक पातळीवरील कार्यवाही अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यात आला.
हैदराबाद गॅझेटियरच्या अनुषंगाने प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, यासंदर्भातील अर्जांबाबत महाधिवक्त्यांचे कायदेशीर मत घेण्यात येणार आहे. तसेच सातारा आणि कोल्हापूर गॅझेटियर लागू करण्याबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे मंत्री डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाला न्याय देताना संविधानिक व न्यायिक चौकटीत राहून आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी शासन पूर्णपणे सकारात्मक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील शासन मराठा समाजाला कायदेशीर आणि टिकणारे आरक्षण मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्याचवेळी इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाला किंवा त्यांच्या हक्कांना कोणताही धक्का लागू नये, याचीही शासनाकडून पूर्ण दक्षता घेतली जात असल्याचे मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.
प्रशासकीय यंत्रणेकडून सुरू असलेली कार्यवाही, उपलब्ध करून देण्यात आलेल्या नोंदी, प्रमाणपत्रांचे वाटप आणि जात पडताळणीची प्रकरणे याबाबतची माहिती संबंधित घटकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. शासनाची ही कार्यवाही अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सातत्याने करण्यात येत असल्याचेही मंत्री डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले.
What's Your Reaction?