अल्पसंख्याकांना शिक्षण, व्यवसाय व घर बांधण्यासाठी बिनव्याजी कर्ज देणार- मंत्री अब्दुल सत्तार

 0
अल्पसंख्याकांना शिक्षण, व्यवसाय व घर बांधण्यासाठी बिनव्याजी कर्ज देणार- मंत्री अब्दुल सत्तार

अल्पसंख्याकांना शिक्षण, व्यवसाय, घर बांधण्यासाठी बिनव्याजी कर्ज देणार- मंत्री अब्दुल सत्तार 

सिल्लोड,दि.9(डि-24 न्यूज) अल्पसंख्याक समाजातील पात्र लाभार्थ्यांना व्यवसाय व शिक्षणासाठी एक लाखापासून 20 लाखापर्यंत तर घर बांधकाम करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज पुरवठा अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे अल्पसंख्याक विकास, औकाफ व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे दिली. अल्पसंख्याक समाजबांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न, समस्या, अडचणी सोडवण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका आहे. अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवू असे स्पष्ट करीत अल्पसंख्याक विभाग अंतर्गत विविध योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील अब्दुल सत्तार यांनी केले.

शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या वतीने सिल्लोड येथे आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे अल्पसंख्याक विकास, औकाफ व पणन,मंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते दिप प्रज्वलनाने संपन्न झाले. या कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना अब्दुल सत्तार बोलत होते. या कार्यशाळेस समाज बांधवांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेत महिला भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती.

       

यावेळी अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, अल्पसंख्याक विकास विभागाचे उपसचिव मोईन ताशिलदार, अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे प्रबंध निदेशक डॉ. लालमिया शेख, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, सोयगावच्या नगराध्यक्षा श्रीमती आशाबी तडवी, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार रमेश जसवंत, गटविकास अधिकारी दादाराव आहिरे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर, दामुअण्णा गव्हाणे, न.प.तील शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, अल्पसंख्याकांसाठी 15 कलमी कार्यक्रम हा महत्वाचा कार्यक्रम असून यामध्ये अल्पसंख्याकांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांना विविध क्षेत्रात मदत करणे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करणे, शिष्यवृत्ती, तरूणांना रोजगार देणे, अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक सुविधा देणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत. अल्पसंख्याकांच्या विविध संस्थामार्फत त्यांच्या अडचणी सोडविण्याचे काम केले जात आहे. अल्पसंख्याकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करू. अल्पसंख्याक समाजबांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यशासनाची सकारात्मक भूमिका आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी अल्पसंख्याक विभागाला 30 कोटी वरून 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली. याबद्दल अब्दुल सत्तार यांनी आभार व्यक्त केले.

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील शिक्षण घेण्यासाठी राज्य शासन सर्वोतोपरी सहकार्य करीत असल्याचे स्पष्ट करीत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्य शासन 40 लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती देईल याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले.

युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी नगर परिषदेच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रस्तावित डॉ. लालमिया शेख यांनी केले. सूत्रसंचालन देवेंद्र सूर्यवंशी आणि शेख शब्बीर यांनी केले. तर अल्पसंख्याक विभागाचे एजाज अहेमद यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

यावेळी अल्पसंख्याक विभागाच्या प्रधान सचिव आय ए कुंदन, उपसचिव मोईन ताशीलदार, अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास लाभार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow