दोन मोबाईल चोरांना जवाहरनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या...!
सिग्मा हॉस्पिटलजवळ मोबाईल चोरी; दोघांना जवाहरनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3 महागडे मोबाईल हस्तगत; एकूण 65 हजारांचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगर, दि.24(डि-24 न्यूज)- सिग्मा हॉस्पिटलजवळ दर्गा रोड परिसरात भाजीपाला घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे लक्ष विचलित करून मोबाईल लंपास करणाऱ्या झारखंड व बिहारमधील दोन संशयित आरोपींना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे तीन महागडे मोबाईल, असा एकूण सुमारे 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी सुमारे 7.45 वाजता फिर्यादी राजेश रामराव सानप हे दर्गा रोडवरील सिग्मा हॉस्पिटलजवळ भाजीपाला घेण्यासाठी आले होते. त्यावेळी दोन इसमांनी त्यांचे लक्ष विचलित करून त्यांच्या खिशातील विवो कंपनीचा 24,999 रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 358/2026 अन्वये BNS कलम 303(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच जवाहरनगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस अंमलदार मारोती गोरे व राजू शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. गुप्त बातमीदाराच्या मदतीने पोलिसांना दोन इसम दर्गा चौक परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे शेख फय्याज शेख असलम (वय 21, रा. महाराजपूर, झारखंड) आणि मकसुद आलम इदवाह आलम (वय 20, रा. महुचौक, जिल्हा कठीयाल, बिहार) अशी सांगितली.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांच्या ताब्यात तीन महागडे मोबाईल आढळून आले. त्यापैकी विवो कंपनीचा मोबाईल 24,999 रुपये, ओप्पो कंपनीचा मोबाईल 20 हजार रुपये आणि पोको कंपनीचा मोबाईल 20 हजार रुपये किमतीचा असल्याचे समोर आले. असा एकूण 64,999 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपासात पोलीस अंमलदार मारोती गोरे व राजू शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
What's Your Reaction?