पदवीधर मतदारसंघ निवडणूक, आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मनाई आदेश जारी
पदवीधर मतदारसंघ निवडणूक; आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी... अंमलबजावणीसाठी मनाई आदेश जारी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 28 (डि-24 न्यूज) - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 चा कार्यक्रम जाहीर झाल्याने दि. 22 सप्टेंबरपासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, निर्भय व सुरळीत पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था तसेच आवश्यक सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले आहेत.
ध्वनीक्षेपक वापरावर निर्बंध...
निवडणूक आचारसंहिता कालावधीत पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सकाळी 6 ते रात्री 10 वा. नंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर वा कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार, इतर व्यक्ती यांनी निश्चित ठिकाणी ध्वनीक्षेपकाचा वापर करावा, त्यासाठी परवानगी घ्यावी व त्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना द्यावी,असे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले आहेत. हे आदेश दि.31 ऑक्टोबर पर्यंत अंमलात राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पोस्टर्स, बॅनर्स लावण्यावर निर्बंध...
निवडणूक आचारसंहिता कालावधीत सार्वजनिक इमारती, सार्वजनिक रस्ता इ. ठिकाणी कोणत्याही राजकीय पक्ष, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांनी राजकीय बॅनर्स, पोस्टर्स, कटआऊट्स, पेन्टिंग्ज, होर्डिंग इ. अपघात होईल अशा पद्धतीने लावण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
वाहनांवर घोषवाक्य लिहिणे, झेंडे लावण्यावर निर्बंध...
निवडणूक आचारसंहिता कालावधीत सक्षम प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय ऑटो रिक्षा, टेम्पो, सायकल रिक्षा, सायकल व इतर वाहनांवर राजकीय पक्षाचे बोधचिन्ह, झेंडे वा घोषवाक्य लिहिण्यास इ. निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले आहेत. हे आदेश दि.31 ऑक्टोबर पर्यंत अंमलात राहतील असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
मुद्रकांवर निर्बंध...
निवडणूक आचारसंहिता कालावधीत मुद्रणालयांनी व प्रकासहकांनी नमुना मतपत्रिका छापतांना इतर उमेदवारांचे नाव व त्यांना नेमून देण्यात आलेले चिन्ह छापणे, नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे, आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागदाच्या आकारात नमुना मतपत्रिका छापणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
What's Your Reaction?