खुलताबाद पोलिसांची वाहनधारकांना शिस्त लागावी यासाठी रस्त्यावर उतरून नाकाबंदी...!
सुरक्षेसाठी खुलताबाद पोलिसांचा अॅक्शन मोड; ईदगाह टी-पॉईंटवर मोठी नाकाबंदी...!
पोलीस निरीक्षक प्रकाश महाजन यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर...
खुलताबाद, दि.8(डि-24 न्यूज)- खुलताबाद वेरूळ मार्गावर
वाहनधारकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची पावले उचलत खुलताबाद पोलिसांनी ईदगाह टी-पॉईंट येथे अचानक नाकाबंदी करत अनेक वाहनधारकांवर मोठी कारवाई केली. वाहतुकीच्या नियमांना हरताळ फासणाऱ्या अनेक वाहनांवर यावेळी इ-चलान'द्वारे दंडात्मक कारवाईचा दणका देण्यात आला. या मोहिमेत फॅन्सी नंबर प्लेट असणारी वाहने, विना लायसन्स फिरणारे चालक आणि सीट बेल्ट न वापरणाऱ्यांवर विशेष कारवाई करण्यात आली. भर उन्हात स्वतः रस्त्यावर उतरून प्रत्येक वाहनाची बारकाईने तपासणी करणारे खुलताबादचे पोलीस निरीक्षक प्रकाश महाजन यांच्या या कौतुकास्पद कामगिरीची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्यासोबत नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बोडखे आणि ग्रामीण वाहतूक शाखेचे शेख अनवर यांनी चोख भूमिका बजावली.
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी राहुल दांडगे, शेख कलीम, फिरोज पठाण, शेख जाकीर, उत्तम खटके आणि अंबादास पावणे यांच्यासह पोलीस पथकाने ईदगाह टी-पॉईंटवर बॅरिकेड्स लावून चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या या अचानक झालेल्या अॅक्शन प्लॅनमुळे बेशिस्त वाहनधारकांचे धाबे दणाणले असून, या कारवाईचे सुजाण नागरिकांकडून स्वागत होत आहे.
What's Your Reaction?