रोशन गेट परिसरात काळोख, वीजपुरवठा पूर्ववत कधी होईल याची प्रतिक्षा...?

 0
रोशन गेट परिसरात काळोख, वीजपुरवठा पूर्ववत कधी होईल याची प्रतिक्षा...?

रोशन गेट करीम कॉलनीत दिवसभर वीज गुल; नवीन लाईनही ठरली निष्फळ, नागरिक त्रस्त...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज)- रोशन गेट परिसरातील करीम कॉलनी येथे रविवारी सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. परिसरातील वीजेचा भार कमी करण्यासाठी महावितरणकडून नवीन केबल व नवीन खांब उभारून स्वतंत्र लाईन टाकण्याचे काम सकाळपासून सुरू करण्यात आले. मात्र हे काम पूर्ण झाल्यानंतरही वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही.

संध्याकाळी सुमारे सहा वाजता काही काळासाठी वीज आली, मात्र काही मिनिटांतच पुन्हा खंडित झाली. याबाबत नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याची माहिती देण्यात आली. नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत, सुमारे दोन वाजेपर्यंत चालण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत डिपी आली नसल्याने रोशन गेट परिसरात काळोख आहे. वीज ग्राहक उकाड्याने त्रस्त झाले आहेत वीजपुरवठा कधी सुरू होईल याची प्रतिक्षा सुरू आहे. महावितरणचे कर्मचारी रात्र जागून काढत वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली आहे.

दिवसभर वीज नसल्याने उकाड्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाणीपुरवठा, घरगुती कामे तसेच व्यावसायिक व्यवहारांवरही परिणाम झाला आहे. महावितरणने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow