घरकुलच्या लाभार्थ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांनी गृहकर्ज उपलब्ध करून देण्याचे विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांचे आदेश...!

 0
घरकुलच्या लाभार्थ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांनी गृहकर्ज उपलब्ध करून देण्याचे विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांचे आदेश...!

घरकुलच्या पात्र लाभार्थ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांनी गृहकर्ज उपलब्ध करून देण्याचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे आदेश...

लाभार्थ्यांनी ज्या राष्ट्रीयीकृत बँकेत खाते आहे तेथे घरकुल साठी गृहकर्ज घेण्यासाठी संपर्क साधावा...

प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी व गरजू पत्रकारांना सुलभ गृहकर्ज मिळावे, यासाठी युवा शक्ती पत्रकार संघाचे विभागीय आयुक्तांना जनहिताचे निवेदन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज)-प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत घरकुलच्या पात्र लाभार्थ्यांना, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि स्वतःच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या गरजू लाभार्थ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून सुलभ, परवडणारे व वेळेत गृहकर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, या मागणीसाठी युवा शक्ती पत्रकार संघाच्या वतीने विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांना जनहिताचे निवेदन देण्यात आले. निवेदनाची गांभीर्याने दखल घेत विभागीय आयुक्तांनी अग्रणी बँक अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना गृहकर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमार्फत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत घरकुलांचे काम समाधानकारक पद्धतीने सुरू असून अनेक गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होत आहे. मात्र, अनेक लाभार्थ्यांना पहिला हप्ता भरल्यानंतर उर्वरित रक्कम भरण्यासाठी आवश्यक असलेले गृहकर्ज राष्ट्रीयीकृत बँकांकडून सहज उपलब्ध होत नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी अनेकांना खासगी बँका किंवा वित्तीय संस्थांकडून अधिक व्याजदराने गृहकर्ज घ्यावे लागत असून त्याचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे.

युवा शक्ती पत्रकार संघाने विभागीय आयुक्तांकडे प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांच्या गृहकर्ज अर्जांना प्राधान्याने मंजुरी देण्यात यावी, कर्ज मंजुरीची प्रक्रिया अधिक सुलभ व गतिमान करण्यात यावी, सवलतीच्या व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध करून द्यावे, प्रक्रिया शुल्कात सवलत द्यावी तसेच राष्ट्रीयीकृत बँका व संबंधित वित्तीय संस्थांमध्ये प्रभावी समन्वय साधून लाभार्थ्यांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी केली.

यावेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत संबंधित बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (CEO) दूरध्वनीवरून संपर्क साधला. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना गृहकर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक सहकार्य करावे आणि आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच या विषयात प्रशासनामार्फत आवश्यक समन्वय साधला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

युवा शक्ती पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा साप्ताहिक औरंगाबाद युवाचे संपादक अब्दुल कय्यूम यांनी सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलांचे काम योग्य पद्धतीने सुरू असले तरी अनेक लाभार्थी आणि काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल पत्रकारांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून गृहकर्ज मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांना जास्त व्याजदराने खासगी वित्तीय संस्थांकडून कर्ज घ्यावे लागत असून ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी पात्र लाभार्थ्यांना सुलभ व परवडणाऱ्या अटींवर गृहकर्ज उपलब्ध करून दिल्यास गोरगरीब, कष्टकरी, निम्न व मध्यमवर्गीय कुटुंबांसह गरजू पत्रकारांचेही स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होण्यास मोठी मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांना निवेदन देताना युवा शक्ती पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अब्दुल कय्यूम, अलीम बेग, रियाज अन्सारी, आरेफ देशमुख, अथर चिश्ती, एजाज बेग आणि वसीम खान आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow