बीडकीनचे 5 युवक समुद्रात बुडाले, प्रशासनाकडून शोधकार्य सुरू

 0
बीडकीनचे 5 युवक समुद्रात बुडाले, प्रशासनाकडून शोधकार्य सुरू

समुद्राच्या लाटांचा अंदाज चुकला..! गणपतीपुळ्यात बिडकीनच्या 5 युवक बुडाले, पथकाकडून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू...

गणपतीपुळे, छत्रपती संभाजीनगर, दि.20(डि-24 न्यूज) - रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन येथील 5 तरुण समुद्रात बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी हि घडली. समुद्राच्या पाण्याचा आणि लाटांचा अचूक अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या 19 लोकांच्या ग्रुप मधील काही व्यक्ती समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. तीन व्यक्ती यांना स्थानिक बचाव पथकाने वाचवले असून पाच व्यक्ती समुद्रात बुडाले आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी पथक प्रयत्न करत असल्याचे प्रशासनाने सांगितले. या घटनेत आदीत्य संतोष राऊत, वय 22, अनिकेत बंडू हिवराळे, वय 20, आनंद राजू नरवडे, वय 20, प्रेम दीपक आदमाने, वय 19, यश रामेश्वर कांबळे हे समुद्रात बुडाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून एकूण 19 जणांचा ग्रुप गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. शनिवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या दरम्यान या ग्रुपमधील काही तरुण समुद्रात उतरले. मात्र, अचानक वाढलेल्या लाटांमुळे आणि समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाच जण पाण्याच्या प्रवाहात ओढले गेले.

घटनेची माहिती मिळताच किनाऱ्यावरील स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि तैनात असलेल्या जीवरक्षकांनी तत्काळ समुद्रात धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र समुद्रात उधाणासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. तरीही स्थानिक प्रशासन, पोलीस, जीवरक्षक आणि स्थानिक बोटींच्या मदतीने बेपत्ता पर्यटकांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

या संदर्भात रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनीही माहिती देत शोधकार्य सुरू असल्याचे सांगितले आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद घेताना सुरक्षिततेचे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या घटनेने पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला आहे.

तलाठी मालगुंड, जिल्हा रत्नागिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळी 4:55 वाजता प्रेम आदमाने वय - 19 यांचा मृतदेह मालगुंड खाडी किनाऱ्याजवळ मिळाला आहे. अद्याप चार जणांचा शोध सुरू आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow