विशेष मतदार नोंदणी शिबिर, पात्र नागरिकांनी मतदार नोंदणीची संधी साधावी - जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी
विशेष मतदार नोंदणी शिबीर ; पात्र नागरिकांनी मतदार नोंदणीची संधी साधावी – जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 11 (डि-24 न्यूज) – विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR)-2026 अंतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर दि. 19, 20, 26 व 27 सप्टेंबर रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेऊन मतदार यादीत नाव नोंदणी तसेच आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यासाठी दि. 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदत आहे.
मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या पात्र नागरिकांना नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी नमुना-8 (Form-6) भरता येईल. मतदार यादीतील नोंदीमध्ये दुरुस्ती, स्थलांतर अथवा अन्य आवश्यक बदलांसाठी नमुना-8 (Form-8), तर अपात्र, मृत, दुबार अथवा अन्य कारणांमुळे नाव वगळण्यासाठी नमुना-७ (Form-7) द्वारे अर्ज करता येईल.
दि. 1 ऑक्टोबर 2026 रोजी 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय पूर्ण करणाऱ्या आणि मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करून घ्यावी. विशेषतः 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर दि. 19, 20, 26 व 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी ६ या वेळेत विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत मतदार नोंदणी, दुरुस्ती तसेच नाव वगळण्यासंदर्भातील अर्ज स्वीकारण्यात येतील.
ज्या पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत नाहीत अथवा ज्यांना मतदार यादीतील नोंदीमध्ये दुरुस्ती करावयाची आहे, त्यांनी संबंधित मतदान केंद्रावरील विशेष शिबिरास भेट देऊन विहित मुदतीत अर्ज सादर करावेत. कोणताही पात्र मतदार मतदार यादीत नाव नोंदविण्यापासून वंचित राहू नये, यासाठी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे.
What's Your Reaction?