बायजीपुरा उपकेंद्रावरील ग्राहकांना मिळणार अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा, नवीन ट्रान्सफाॅर्मर कार्यान्वित...

 0
बायजीपुरा उपकेंद्रावरील ग्राहकांना मिळणार अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा, नवीन ट्रान्सफाॅर्मर कार्यान्वित...

बायजीपुरा उपकेंद्रावरील ग्राहकांना मिळणार अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा...

10 एमव्हीएचा नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) - ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने बायजीपुरा उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ केली. महापौर समीर राजुरकर यांच्या हस्ते 10 एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर शनिवारी (4 एप्रिल रोजी) रात्री कार्यान्वित करण्यात आला. यामुळे सुमारे 15 ते 20 हजार वीजग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

बायजीपुरा उपकेंद्रात 10 एमव्हीए व 5 एमव्हीए क्षमतेचा प्रत्येकी एक पॉवर ट्रान्सफॉर्मर होता. उपकेंद्रातून परिसरातील जवळपास 15 ते 20 हजार ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र दिवसेंदिवस वाढणारी ग्राहकांची संख्या व विजेच्या मागणीमुळे सुरळीत वीजपुरवठा करण्यात अडचणी येत होत्या. त्यावर मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-2.0 मध्ये उपकेंद्रातील एका 5 एमव्हीएच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ करून तो 10 एमव्हीए करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

शनिवारी सकाळी 7 वाजता काम सुरू करण्यात आले. 8 वाजेनंतर वीजपुरवठा बंद करून आधी 5 एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर काढण्यात आला. त्यानंतर 10 एमव्हीए क्षमतेचा जवळपास 11 टन वजनाचा महाकाय ट्रान्सफॉर्मर काळजीपूर्वक बसवणे हे जिकिरीचे काम होते. महावितरणच्या अभियंते, कर्मचाऱ्यांनी 10 तास अथक परिश्रम घेऊन संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवला. या कामासाठी उपकेंद्रातील सर्व वाहिन्यांवरील वीजपुरवठा सुरक्षेसाठी बंद ठेवण्यात आला होता. सर्व प्रकारच्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर नवीन ट्रान्सफॉर्मर सायंकाळी 8 वाजता विद्युतभारित करण्यात आला. त्यानंतर सर्व वाहिन्यांवरील ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला.

आता उपकेंद्रातील दोन्ही पॉवर ट्रान्सफॉर्मरची एकत्रित क्षमता 20 एमव्हीए झाल्याने ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळणार आहे. यात जिन्सी परिसर, रोशनगेट, शहाबाजार, जुना बाजार, शहागंज, बांबू मार्केट, जाफरगेट, जुना मोंढा, अहिंसानगर, बायजीपुरा, संजयनगर व बायजीपुरा आदी वसाहतीतील ग्राहकांना प्रामुख्याने लाभ होणार आहे. ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करताना महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्ष नेते समीर साजेद, कार्यकारी अभियंता प्रसाद महातोले, प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेंद्र राठोड, रवींद्र गायकवाड, सहायक अभियंता अनिल बनसोडे, संतोष कोल्हे, प्रदीप श्रेष्ठ, राहुल चव्हाण, मनीष डिघुळे यांच्यासह स्थानिक नगरसेवक व महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow