सातारा परिसरात नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमण काढले, दोन बिल्डरवर गुन्हा दाखल...!

 0
सातारा परिसरात नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमण काढले, दोन बिल्डरवर गुन्हा दाखल...!

सातारा परिसर, गट क्रमांक 4 येथील नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज)- शहरातील सातारा परिसर, गट क्रमांक 4 येथे श्री अनिल सांगवी व श्री अनिल संचेती यांनी सिमेंटचे पाईप टाकून नैसर्गिक नाला कंपाऊंड टाकून संपूर्णपणे बुजवला होता. तर, नाल्याचा नैसर्गिक प्रवाह वळवून सुमारे 1200 मिमी. चे अजस्त्र पाईप टाकून नाला एका बाजूने त्यातून प्रवाहीत केला होता. तसेच या बांधकामाबाबत अतिक्रमण नियंत्रण अधिकारी श्री.संतोष वाहुळे यांनी सुनावणी घेतली असता त्यात महानगरपालिकेची कोणतीही वैध परवानगी घेतली नसल्याची बाब निदर्शनास आली होती. या अनधिकृत बांधकामामुळे पावसाळ्यात पाणी तुंबून परिसरात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हे सर्व अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले आहे. तसेच संबंधित यांचेवर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तद्वतच या कारवाई साठी लागलेले मनुष्यबळ व मशिनरी यांचा संपूर्ण खर्च संबंधिताकडून वसूल करण्यात येणार आहे.

ही कारवाई आयुक्त महोदय यांचे आदेशानुसार अतिक्रमण नियंत्रण अधिकारी, उपायुक्त महोदया व सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

या कारवाईदरम्यान नाल्यात टाकण्यात आलेले सिमेंटचे 63 पाईप जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले, चारही बाजूचे कंपाऊंड जमीनदोस्त करून नाल्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करण्यात आला.

सदर कारवाईमध्ये सहाय्यक आयुक्त श्री. भारत बिऱ्हारे, सहाय्यक आयुक्त श्री. संजय सुरडकर, इमारत निरीक्षक श्री. कुणाल भोसले, इमारत निरीक्षक श्री. रवींद्र देसाई, श्री. अशोक कदम, माजी सैनिक व अतिक्रमण पथकातील इतर कर्मचारी उपस्थित होते.

महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, नैसर्गिक नाले, गटारे व सार्वजनिक जागांवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करू नये. असे आढळून आल्यास महानगरपालिका नियमानुसार कठोर कारवाई

करेल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow