कृषीमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची वंचितची मागणी...

 0
कृषीमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची वंचितची मागणी...

सभागृहात ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा....!

वंचित बहुजन आघाडीची आग्रही मागणी!!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) -

राज्याचा कृषिमंत्री हा शेती आणि शेतकरी यांच्या बद्दल आस्था असणारा असावा, त्या प्रश्नांची जाण असणारा असावा आणि त्यांच्या प्रश्नांना सोडवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला असावा अशी साधारण जनतेची अपेक्षा असते. दुर्दैवाने महाराष्ट्राला जो कृषिमंत्री मिळालेय त्यांची शेतकऱ्यांबद्दल किती आस्था आहे हे यांच्या आधी केलेल्या बेताल विधानावरून लक्षात येते. शेतीचे ज्ञान त्यांचे त्यांना माहिती आणि प्रश्न सोडवण्याची त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती किती आहे हे त्यांनी सभागृहात बसून जंगली रमी सारखा जुगार खेळून सिद्ध केलं आहे. 

या देशाने आजपर्यंत दुधाच्या क्षेत्रातील श्वेतक्रांती पाहिली, पिकांच्या संदर्भातली हरित क्रांती पहिली. आणि आता महाराष्ट्राच्या विधानभवनात बसून ऑनलाईन जुगार खेळून या कृषिमंत्र्यांनी केलेली जुगार क्रांती ही पाहिली. शेती, शेतकरी आणि त्यांच्या प्रश्नाशी जराही बांधीलकी नसणाऱ्या या कृषिमंत्र्यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन त्या ठिकाणी ज्याला शेती संदर्भात खऱ्या अर्थाने जाण असेल आणि त्यांची शेतकऱ्यांच्या संदर्भात बांधिलकी असेल अशा व्यक्तीलाच ते खाते देण्यात यावे.  

वंचित बहुजन आघाडीचे ही ठाम आग्रही आणि महत्त्वाची मागणी आहे की माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम करणे अपेक्षित आहे त्याऐवजी सभागृहात बसून जर का ऑनलाइन जुगार खेळत असतील तर तो खेळण्यासाठी त्यांना मोकळीक शासनाने द्यावी, त्यांना मंत्रिपदाच्या कामात अडकवून ठेवू नये. जास्तीत जास्त वेळ त्यांना रमी खेळता येईल यासाठी तातडीने त्यांच्याकडून राजीनामा घेण्यात यावा आणि त्यांना या जबाबदारीतून मुक्त करावं, अशी वंचित बहुजन आघाडीची आग्रही मागणी पत्रकार परिषदेत प्रवक्ते सिध्दार्थ मोकळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याप्रसंगी प्रवक्ते तय्यब जफर, जिल्हाध्यक्ष योगेश बन आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow