अल्पसंख्याक मुस्लिम विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी मौलाना आझाद एकता फाऊंडेशनचा पुढाकार...

 0
अल्पसंख्याक मुस्लिम विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी मौलाना आझाद एकता फाऊंडेशनचा पुढाकार...

अल्पसंख्याक मुस्लिम विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी मौलाना आझाद एकता फाऊंडेशनचा पुढाकार

उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत व मार्गदर्शन केंद्र सुरू करणार; शिक्षक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 12 (डि-24 न्यूज) – शहरातील अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मौलाना आझाद एकता फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. यूपीएससी, एमपीएससी, पोलीस भरती तसेच विविध स्पर्धा परीक्षा आणि शासकीय सेवांमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे, यासाठी आर्थिक मदत आणि योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणारे केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे सुरू करण्याचा संकल्प फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आला.

भारतरत्न डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे आयोजन मौलाना आझाद एकता फाऊंडेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष युसूफ अन्सारी यांनी केले होते. शिक्षणतज्ज्ञ डॉ. रऊफ पठाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्याच्या विविध भागांतून शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना सांगितले की, मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्ता, गुणवत्ता आणि विविध कौशल्ये आहेत. मात्र, योग्य मार्गदर्शन, आर्थिक पाठबळ आणि शैक्षणिक संधींच्या अभावामुळे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा व प्रशासकीय सेवांमध्ये अपेक्षित यश मिळवू शकत नाहीत. ही परिस्थिती बदलण्यासाठी राजकारणापासून अलिप्त असे गैरराजकीय व्यासपीठ उभारण्याची गरज आहे.

या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर येथे उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत आणि मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील अनेक दानशूर व्यक्ती या उपक्रमाला आर्थिक सहकार्य करण्यास तयार असून, केवळ इच्छाशक्ती आणि संघटित प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. मुंबईच्या धर्तीवर कायमस्वरूपी मार्गदर्शन केंद्र उभारण्यासाठी मुंबई येथे लवकरच बैठक घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

याशिवाय मार्टी योजनेची अंमलबजावणी करावी, 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेत समाजाची योग्य नोंद व्हावी, तसेच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी आणि शिष्यवृत्तीचे प्रश्न शासनाने प्राधान्याने सोडवावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

मौलाना आझाद एकता फाऊंडेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष युसूफ अन्सारी यांनी मुस्लिम अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी घेतलेल्या पुढाकाराचे राज्यभरातून आलेल्या मान्यवरांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमात विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.

शिक्षक व मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव

मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक आणि मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला अध्यक्ष डॉ. रऊफ पठाण, अमेस्टोचे अध्यक्ष अब्दुल मुकीम देशमुख, दैनिक हिंदुस्थानचे संपादक नायाब अन्सारी, प्रसिद्ध शायर कासिम इमाम (मुंबई), ओबीसी ऑर्गनायझेशनचे चेअरमन इकबाल अन्सारी (मुंबई), ऑल इंडिया जमीयतूल कुरेशचे जनरल सेक्रेटरी ॲड. मजीद कुरेशी, रोटी बँकचे अध्यक्ष युसूफ मुकाती, पाचोरा येथील खलील देशमुख, सोलापूरचे शौकत पटेल, महिला अध्यक्ष शबाना शेख, मिर्झा सलीम बेग, अब्दुल्ला शकील, जमील खान सर, जुबेर देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मौलाना इक्बाल अन्सारी यांनी केले, तर मुदस्सर अन्सारी यांनी उपस्थितांचे

आभार मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow