खुलताबाद उरुस निमित्ताने भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश...!
जर जरी बक्ष उरूस यात्रोत्सव
भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्या– जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 17 (डि-24 न्यूज) – खुलताबाद येथील हजरत ख्वाजा जर जरी बक्ष उरूस यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना आरोग्य, पिण्याचे पाणी, वीज, एसटी बस, स्वच्छतागृहे इ. सुविधांची प्राधान्याने उपलब्धता करून द्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित उरूस यात्रेच्या पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, उपविभागीय अधिकारी कन्नड संतोष गोरड, तहसीलदार खुलताबाद संतोष गुट्टे, मुख्याधिकारी समीर शेख, नगराध्यक्ष अमीर पटेल, दर्गा समितीचे अध्यक्ष इजाज अहमद, उपाध्यक्ष इमरान जहागिरदार, सदस्य सचिव कामरान अहमद तसेच इतर सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गौडा यांनी सांगितले की, उरूसासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.
उरूस कालावधीत वाहनतळ, राहटपाळणे व इतर मनोरंजनाच्या साधनांमुळे गर्दी होणार नाही, यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यंदा उरूस आणि श्रावण महिना एकाच कालावधीत असल्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागाने वाहतूक व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्यावे, तसेच खुलताबाद शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
उरूस काळात तहसील कार्यालय आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, महावितरण, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, खुलताबाद नगरपालिका यांनी समन्वयाने काम करुन यात्रा सुरळीत व सुरक्षितपणे पार पाडावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी गौडा यांनी दिल्या.
What's Your Reaction?