ढोरेगावात केंद्र स्तरीय शिक्षण परिषद उत्साहात, निपुण महाराष्ट्र सह अध्ययन समृध्दीवर मंथन...

 0
ढोरेगावात केंद्र स्तरीय शिक्षण परिषद उत्साहात, निपुण महाराष्ट्र सह अध्ययन समृध्दीवर मंथन...

ढोरेगावात केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात; ‘निपुण महाराष्ट्र’सह अध्ययन समृद्धीवर मंथन...

शिक्षकांच्या अनुभवांची देवाणघेवाण; गुणवत्तावृद्धीसाठी कृतीआधारित अध्यापनावर भर.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज)- “शिक्षण व्यवस्था ही केवळ पाठ्यपुस्तकांपुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारी आणि त्यांच्यात आत्मविश्वास, सर्जनशीलता व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारी असली पाहिजे. - कृष्णा पाटील डोणगावकर.

“शिक्षण व्यवस्था ही केवळ पाठ्यपुस्तकांपुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारी आणि त्यांच्यात आत्मविश्वास, सर्जनशीलता व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारी असली पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेची कोणतीही कमतरता नाही; त्यांना योग्य संधी, दर्जेदार मार्गदर्शन आणि प्रोत्साहनाची गरज आहे. ‘निपुण महाराष्ट्र’ अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भाषा व गणित विषयातील मूलभूत क्षमता अधिक भक्कम करण्यासाठी शिक्षकांनी कृतीआधारित व आनंददायी अध्यापनावर भर द्यावा,” असे प्रतिपादन शेंदूरवादा गटाचे जिल्हा परिषद सदस्य कृष्णा पाटील डोणगावकर यांनी केले.

“शिक्षकांनी केलेली अनुभवांची देवाणघेवाण आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद आहेत. लोकसहभागातून शाळांचा विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व समाजाचा सहभाग वाढविणे ही काळाची गरज आहे. शिक्षक हे समाज परिवर्तनाचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या समान संधी मिळू शकतात. ढोरेगाव केंद्रातील शिक्षकांनी एकत्रितपणे काम करून शैक्षणिक गुणवत्तेत आदर्श निर्माण करावा. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक त्या सर्व शैक्षणिक उपक्रमांना माझे सदैव सहकार्य राहील,” असेही डोणगावकर यांनी सांगितले.

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, ढोरेगाव येथे मंगळवार, 1 सप्टेंबर रोजी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांच्या शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसह विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीला चालना देण्याच्या उद्देशाने झालेल्या या परिषदेत विविध शैक्षणिक विषयांवर सखोल विचारमंथन करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य कृष्णा पाटील डोणगावकर, पंचायत समिती सदस्य रावसाहेब टेके पाटील उपस्थित होते. तसेच गटशिक्षणाधिकारी अरविंद कापसे, केंद्रप्रमुख सचिन डमाळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खलील पटेल, अयुब पटेल, उपसरपंच पुंजाराम पठाडे, केंद्रीय मुख्याध्यापिका अंजली पुऱ्हे, उपक्रमशील शिक्षक राजेश हिवाळे, रामकिशन पांचाळ, अजित पवार, अशोक शेवाळे, राजू गावंडे, सुरेंद्र सूर्यवंशी, रामू पठाडे, सुरेश पठाडे, ज्ञानेश्वर पठाडे, रफिक शेख, विशाल जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

परिषदेच्या प्रारंभी केंद्रीय मुख्याध्यापिका अंजली पुऱ्हे यांनी प्रस्तावना केली. राजेश हिवाळे यांनी मागील महिन्यातील शैक्षणिक कामांचा आढावा घेत उल्लेखनीय उपक्रम तसेच शिक्षकांसमोरील समस्या यावर मार्गदर्शन केले.

शिक्षणातील गुणवत्तावृद्धीसाठी कृतीशील मार्गदर्शन

परिषदेत ‘निपुण महाराष्ट्र’ अभियानातील भाषा कृती कार्यक्रमावर मनेश दारकुंडे, तर गणित कृती कार्यक्रमावर मुग्धा निमसे यांनी मार्गदर्शन केले. संजीवनी सोन्नी यांनी मासिक नियोजन, दिलीप लोणकर यांनी लोकसहभाग, ऐश्वर्या तुपे यांनी डॉ. जयंत नारळीकर अध्ययन समृद्धी कार्यक्रम, तर सुनिता कोटुरवार यांनी आनापान साधना तथा राज्याच्या विविध शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन केले.

नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण...

परिषदेत केंद्रातील शिक्षकांनी आपल्या शाळांमध्ये राबविलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देत अनुभवांची देवाणघेवाण केली. विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत भाषा व गणितीय कौशल्ये विकसित करण्यासाठी नियमित सराव, कृतीआधारित अध्यापन, प्रभावी मासिक नियोजन तसेच पालक व समाजाच्या सहभागावर विशेष भर देण्यात आला.

केंद्रप्रमुख सचिन डमाळे यांच्या अध्यक्षीय समारोपाने परिषदेची सांगता झाली. परिषदेतून मिळालेले ज्ञान, अनुभव आणि नव्या कल्पना शिक्षकांनी प्रत्यक्ष वर्गअध्यापनात प्रभावीपणे वापराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा कुलकर्णी यांनी केले, तर मनोज घुले यांनी आभार मानले. केंद्रातील शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शिक्षण परिषद यशस्वी ठरली. शिक्षकांच्या अनुभवातून नव्या शैक्षणिक प्रयोगांना दिशा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीला गती देणारी परिषद, अशी भावना यावेळी

व्यक्त करण्यात आली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow