आजपासून शहरात हेल्मेट बंधनकारक, पोलिस ठाणे निहाय तपासणी सुरू होणार...?
आजपासून हेल्मेट बंधनकारक; पोलिस ठाणेनिहाय तपासणी...
हेल्मेट न वापरणाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंड...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1 (डि-24 न्यूज) – राज्यभरात अपघाती मृत्यूंची संख्या 10 टक्क्यांनी कमी करण्याच्या उद्देशाने पोलिस महासंचालक कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार शहर पोलिसांकडून हेल्मेट वापराबाबतची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. मागील 3 महिन्यांपासून शहर पोलिस दलाकडून हेल्मेट जनजागृती व कारवाई सुरू असून, आता 1 सप्टेंबरपासून वाहनधारकांसाठी हेल्मेटची सक्ती अधिक कडक करण्यात येणार आहे.
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जून महिन्यात प्रथम पोलिस कर्मचारी आणि त्यानंतर शासकीय कार्यालयांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यात आली. मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात आता सर्वसामान्य नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शहरातील वाढते अपघात रोखण्यासाठी आणि रस्ते सुरक्षेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यांनाही जबाबदारी देण्यात आली आहे. संबंधित पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील प्रमुख चौक तसेच रस्त्यांवर विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्यांची वाहतूक शाखेच्या पथकाकडून संयुक्तपणे तपासणी करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
काय आहे कायदा...?
मोटार वाहन कायदा, 1988 मधील कलम 129 नुसार दुचाकी चालक तसेच मागे बसणाऱ्या व्यक्तीनेही हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास मोटार वाहन कायदा (सुधारणा) 2019 मधील कलम 194 (ड) नुसार एक हजार रुपयांचा दंड आणि 3 महिन्यांसाठी वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याची तरतूद आहे.
नागरिकांनी स्वतःहून हेल्मेटला प्राधान्य द्यावे
हेल्मेटचा वापर केवळ पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी नव्हे, तर स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी करावा. प्रत्येक वाहनधारकाने सुरक्षिततेला प्राधान्य देऊन हेल्मेट वापरावे. विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितले.
शहरात कार्यवाईची वेळ...
प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत हेल्मेट तपासणी मोहीम सकाळी 9 ते दुपारी 1, सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत.
What's Your Reaction?