माझी बहिण लाडकी योजनेसह कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- डॉ.नीलमताई गो-हे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन पात्र लाभार्थ्यांना तत्परतेने लाभ द्या - डॉ. नीलमताई गोऱ्हे
टंचाई स्थितीतील सवलतीबाबत प्रशासनाने केलेली कार्यवाही तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह कल्याणकारी योजनांचा आढावा
छ. संभाजीनगर(औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज) राज्य शासनाने जाहीर केलेल्या टंचाई स्थितीतील सवलती व उपाययोजनांच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती तसेच पर्जन्यमान यासह विविध योजनांचा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी आज आढावा घेतला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह शासनाच्या महिला तसेच सर्वच घटकांसाठीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन पात्र लाभार्थ्यांना तत्परतेने लाभ द्या, असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी ‘छत्रपती संभाजीनगर विभागातील टंचाई स्थिती व सवलतीबाबत प्रशासनाने केलेली कार्यवाही तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह महिलांच्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त दिलीप गावडे, पोलीस आयुक्त प्रविण पवार, उपायुक्त जगदिश मिनीयार, नयना बोंदांर्डे, डॉ. अनंत गव्हाणे, महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त गणेश पुंगळे, महिला व बालविकास विभागाच्या डॉ. सिमा जगताप, कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, राज्य शासनाने जाहीर केलेल्या टंचाईस्थितीतील सवलती व उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाने चांगले काम केले आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शासनाने शुल्कमाफीच्या जाहीर केलेल्या सवलतीची अंमलबजावणीदेखील चांगली झाली असून याबाबतच्या प्रलंबित प्रस्तावाबाबत सबंधित विभागाने पाठपुरावा करावा, तसेच आपल्या स्तरावरूनही याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठवाडयातील टंचाईस्थितीतही पुरेसा चारा उपलब्ध राहीला, याबाबत पशुसंवर्धन व कृषी विभागाचे कौतुक करून डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, मराठवाडा विभागातील आठही जिल्हयात या दोन्ही विभागांच्या चारा नियोजनामुळे हे शक्य झाले आहे. राज्यातील इतर जिल्हयासांठी चारा लागवडचा हा पॅटर्न मार्गदर्शक ठरणारा आहे. तसेच सप्टेंबरअखेरपर्यंत ज्या गावांना टँकरने पाणीपुरवठयाची गरज भासेल, अशा गावांच्या कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव शासनाकडे पाठवा, असे निर्देशही डॉ. गोऱ्हे यांनी दिले. यासह आठही सवलतींचा त्यांनी तपशीलवार आढावा घेतला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश देत उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वच जिल्हयात या योजनेला उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 24 लाखावर या योजनेसाठी अर्ज आले आहेत, यामध्ये पात्र लाभार्थ्यांना विहित वेळेत लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने तत्परतेने काम करावे. कामगार कल्याण विभागाकडे घर कामगार महिलांची नोंदणी असते त्यांनी असंघटित महिलांना लाभ देण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच
महिलांची अडवणूक होणार नाही, याची दक्षता घेण्यासोबतच सातत्याने याबाबतचा आढावा घेण्यात यावा.
महिलांसाठीच्या नवीन कायद्यांबाबत महिलांना माहिती देण्यासोबतच अनाथ मुलींना लग्नानंतर माहेरपण असायला हवे, यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देत एक माहेरपण जपणारी संकल्पना जपण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यासह महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना, शासकीय महिला राज्यगह, सखी वन स्टॉप सेंटर, महिला सक्षमीकरण केंद्र, समुपदेश केंद्र, सखी निवास तसेच बालकांसाठीच्या विविध योजनांचाही त्यांनी आढावा घेत याबाबतचा लाभ तत्परतेने द्यावा, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.
यावेळी विभागीय आयुक्त दिलीप गावडे, उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे व उपायुक्त नयना बोंदर्डे यांनी टंचाई स्थितीबाबत माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे लाभार्थी श्री. प्रितम कचरू सोनवणे रा.बहिरगाव, ता.कन्नड, श्री. शहा असिफशहा प्यारुशहा रा.यासिन नगर, जळगाव रोड, हर्सूल तसेच श्री.शेख अयाज रशीद पटेल, रा.पटेल नगर, हर्सूल यांना लाभाचे वितरण करण्यात आले.
यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी
उपस्थित होते.
What's Your Reaction?