राजकारणाची सुरुवात काँग्रेसमध्ये करणारे एम.के.देशमुख भाजपाच्या गळाला...
राजकारणाची सुरुवात काँग्रेसमध्ये करणारे एम.के.देशमुख भाजपाच्या गळाला...
छत्रपती संभाजीनगर दि २९ :- सन 2424 विधानसभा निवडणुकीत मोठ्या धुमधडाक्यात काँग्रेसमध्ये राजकारणाला सुरुवात करणारे एम.के.देशमुख हे औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीच्या तोंडावर भाजपाच्या गळाला लागले आहेत. त्यांना विधानसभा निवडणुकीत पदवीधर मतदार निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी औरंगाबाद पूर्व मधून निवडणूक लढण्यास माघार घेतली होती. शहराच्या पूर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावरून उमेदवारीची चर्चा रंगवून भाजपा उमेदवार अतुल सावे यांना चांगलीच घाम फोडणारे माजी शिक्षण अधिकारी एम.के. देशमुख यांनी अखेर भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. बुधवारी (दि. 29 ऑक्टोबर) मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी औपचारिक प्रवेश केला. यावेळी मंत्री अतुल सावे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार संजय काणेकर, अनिल मकरीये आदी उपस्थित होते.
एम.के. देशमुख हे जालना जिल्हा परिषदेत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात अधिकारी म्हणून कार्यरत होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी पूर्व मतदारसंघातून त्यांना काँग्रेसकडून उमेदवारीही जाहीर करण्यात आली होती. देशमुख यांच्या उमेदवारीमुळे भाजपात चांगलीच चिंता निर्माण झाली होती. मात्र अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी काँग्रेसने अचानक उमेदवार बदलून लहू शेवाळे यांना उमेदवारी दिली. या बदलामुळे निवडणुकीची समीकरणे बदलली आणि भाजपा उमेदवार अतुल सावे यांना काठावर विजय मिळाला.
यानंतर देशमुख यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी जोरदार तयारी सुरू केली होती. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपाला या मतदारसंघात मजबूत उमेदवार मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
"उमेदवारीसाठी प्रवेश नाही" — एम.के. देशमुख
भाजपात प्रवेश घेताना बोलताना एम.के. देशमुख म्हणाले,
"पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी मी भाजपात आलो आहे, अशी चर्चा सुरू आहे; परंतु यात कुठलेही तथ्य नाही. पक्ष जे काम देईल ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन. राजकारणात सेवा आणि कार्याची संधी मिळत असेल तर तो आनंदच आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाजपाचे आमदार संजय काणेकर यांनीही पुढील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत विजयाचे लक्ष्य ठेवल्याचे सांगितले आहे.
देशमुख यांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यातील राजकारणाची समीकरणे बदलणार का...? सगळ्यांच्या नजरा भाजपाच्या पुढील चालीकडे आहे.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ हा महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादीकडे आहे. सतीश चव्हाण हे पदवीधरचे आमदार आहेत. परंतु या निवडणुकीत भाजपा रेकाॅर्डब्रेक मतदारांची नोंदणी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याने चव्हाण यांच्या समोर तगडा उमेदवार एम.के.देशमुख यांच्या सारखा चेहरा देऊन आव्हान उभे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पदवीधर मतदारांनाही तोच चेहरा आणि तोच चेहरा म्हणून कंटाळा आलेला दिसतो यासाठी बदल हवा अशीही अपेक्षा मतदार करत असावेत.
What's Your Reaction?