खरडलेल्या जमिनी व बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य प्रस्ताव त्वरित पाठवा - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 0
खरडलेल्या जमिनी व बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य प्रस्ताव त्वरित पाठवा - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

खरडलेल्या जमिनी व बुजलेल्या विहीरींच्या दुरुस्तीसाठी

अर्थसहाय्य प्रस्ताव त्वरीत पाठवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज)-अतिवृष्टीमुळे शेतजमिनी खरडल्या व विहीरी गाळाने बुजल्या व खचल्या. या जमिनींची व विहिरींची दुरुस्ती करता यावी यासाठी शासनाने अर्थसहाय्य देऊ केले आहे. ही कामे महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात येणार असून त्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी आपापल्या तालुक्यातील अर्थसहाय्य प्रस्ताव त्वरीत पाठवावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

 सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांची आज दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. दोन्ही प्रकारच्या नुकसानीत अनुज्ञेय अर्थसहाय्य देण्यासाठी शासनाच्या नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) शासन निर्णय अनुक्रमे दि.10 व दि.13 ऑक्टोंबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे. 

 त्यानुसार खरडलेल्या जमिनी लागवड करण्यायोग्य दुरुस्त करुन देण्याचे कामे महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजनेतून करावयाची आहेत. त्यासाठी लहान व सीमांत शेतकरी (कमाल मर्यादा 2 हेक्टर) यांच्या जमिनींची दुरुस्ती करण्यात येणार आहे.त्यासाठी संबंधित बाधीत शेतकऱ्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे सातबारा व खातेउतारा यांच्याप्रतिसह लेखी अर्ज करावयाचा आहे. तांत्रिक अधिकारी पाहणी करुन कामनिहाय अंदाज पत्रक तयार करण्यात येईल. या अंदाजपत्रकांना कृषी विस्तार अधिकारी किंवा शाखा अभियंता तांत्रिक मान्यता प्रदान करतील व गटविकास अधिकारी यांच्यामार्फत हे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे आल्यावर एकूण खर्चास मान्यता प्रदान करतील. या कामांसाठी अंदाजपत्रकिय रक्कम जास्तीत जास्त 3 लाख रुपये प्रति हेक्टर या मर्यादेत व 2 हेक्टर कमाल मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत अनुज्ञेय राहतील. तसेच खचलेल्या व बुजलेल्या विहीरींसाठी प्रति विहिर कमाल मर्यादा 30 हजार रुपये अनुज्ञेय असेल. 

 या कामांची प्रक्रिया सर्व यंत्रणांनी तातडीने राबवावी व शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवावी. ज्या शेतकऱ्यांकडे जॉब कार्ड नाही त्यांचे जॉब कार्ड काढून त्यांना योजनेचा लाभ द्यावयाचा आहे.त्यादृष्टिने त्वरीत अनुदान मागणी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow