गंगापूर विधानसभा मतदार यादीत दुबार नावे असणा-या मतदारांना 15 नोव्हेंबर पर्यंत मुदत

 0
गंगापूर विधानसभा मतदार यादीत दुबार नावे असणा-या मतदारांना 15 नोव्हेंबर पर्यंत मुदत

गंगापुर विधानसभाः मतदार यादीत दुबार नावे असणाऱ्या मतदारांना

15 नोव्हेंबरपर्यंत मुदत-मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सुचिता शिंदे

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज)- जिल्ह्यातील 111 गंगापूर विधानसभा मतदार संघातील दुबार मतदार नोंदणी संदर्भात प्राप्त तक्रारींची यादी ही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व जिल्ह्याचे संकेतस्थळ येथे उपलब्ध आहेत. या याद्या पाहून दुबार नावे असलेल्या मतदारांनी आपले नाव नेमके कोणत्या ठिकाणी ठेवणे अपेक्षित आहे, याबाबत पुरव्यांसह दि.31 ऑक्टोंबर ते दि.15 नोव्हेंबर या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून फॉर्म 7 भरुन द्यावा, अन्यथा भारतीय लोकप्रतिनिधीत्व कायदा 1950 चे कलम 22 प्रमाणे कारवाई करण्यात येईल,असे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन डॉ. सुचिता शिंदे यांनी कळविले आहे.

 यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर व तहसिल कार्यालय गंगापूर येथे 111 गंगापूर विधानसभा मतदार संघात दुबार मतदार नोंदणी संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.या तक्रारींबाबत चौकशी व कारवाई करण्यासाठी दि.10 रोजी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची बैठक घेण्यात आली व भारतीय लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1950 अन्वये कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. मौजे रांजणगाव शेणपुंजी येथे दि.13 ते 15 या कालावधीत दुबार मतदारांची पडताळणी व नाव वगळणी याबाबत फॉर्म क्रमांक 7 भरण्यासंदर्भात विशेष शिबीर आयोजीत करण्यात आले. या शिबिरात 151 मतदारांचे नाव वगळण्यासंदर्भात फॉर्म क्रमांक 7 भरण्यात आले. अन्य मतदारांबाबतही मतदान केंद्र अधिकारी यांच्यामार्फत चौकशी सुरु आहे. जिल्हाधिकारी यांनी सुद्धा यासंदर्भात बैठक घेऊन पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. 

 त्यानुसार मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सुचिता शिंदे यांनी या दुबार मतदारांच्या याद्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना उपलब्ध करुन दिल्या असून जे मतदार दिलेल्या पत्त्यावर आढळून आले नाहीत त्याबाबत पंचनामा करावा, असे निर्देश दिले आहेत. तरी गंगापूर विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांनी प्राप्त दुबार मतदारांची यादी , तक्रारी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचे संकेतस्थळ www.chhatrapatisambhajianagar.maharashtra.gov.in येथे प्रसिद्ध केली आहे. 

 तसेच याच याद्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सुद्धा देण्यात आल्या आहेत. मतदारांनी या याद्यांचे अवलोकन करावे. आपले नाव त्यात दुबार असल्यास ते नेमक्या कोणत्या ठिकाणी ठेवणे अपेक्षित आहे याबाबत आवश्यक पुराव्यांसह मतदान केंद्र अधिकारी यांच्याकडे दि.31 ऑक्टोंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत संपर्क साधावा व जेथून नाव वगळावयाचे आहे तेथे फॉर्म नं.7 भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे द्यावा. अन्यथा भारतीय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 चे कलम 22 प्रमाणे कारवाई करण्यात येईल,असे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सुचिता शिंदे यांनी कळविले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow