महापालिकेच्या सुष्म नियोजनामुळे शहरावरचा धोका टळला, मनपाचे सर्वत्र कौतुक
मनपाच्या सुष्म नियोजनामुळे शहरावरचा धोका टळला...
महानगरपालिकेचे सर्व स्तरातून कौतुक....
औरंगाबाद,दि.1(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या सुष्म नियोजनामुळे आज शहरावरील जीवघेणे संकट टळले आहे.
आज सकाळी सिडको एन-3 परिसरात वसंतराव नाईक महाविद्यालय समोर जालना कडे जाणारा हिंदुस्तान पेट्रोलियम (एच पी) या कंपनीचा एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर उड्डाण पुलाच्या सुरवातीच्या दुभाजकाला धडकला. यामुळे यातून गॅस गळती सुरू झाली होती. याची माहिती मिळताच महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटना स्थळी पोहोचले व तत्काळ कारवाई सुरू करण्यात आली.
आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांना या घटनेची माहिती मिळताच तेही तत्काळ घटना स्थळी पोहोचले व त्यांनी तातडीने पुढील सूचना केल्या. या परिसरात काही ज्वलनशील पदार्थ/वस्तू यापासून होणारा धोका लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने 500 मीटर अंतर्गत असणारे शाळा, कॉलेज, बँक ,दुकाने बंद करण्यात आली. तसेच जवळील हॉटेल्स तवरीत रिकामे करण्याची सूचना जी श्रीकांत यांनी दिली. मनपा नागरी मित्र पथकाचे प्रमुख प्रमोद जाधव ,वार्ड कार्यालय 3,5 व 7 यांचे स्वच्छता निरीक्षक यांनी परिसरातील हॉटेल्स रिकामे करून घेतले. तसेच प्रत्येक घरी जाऊन नागरिकांना या घटनेची माहिती दिली व कोणतेही ज्वलनशील पदार्थ,/वस्तू यांचा वापर न करणे बाबत कळविण्यात आले. तसेच प्रशासकांनी यावेळी विद्युत विभागाच्या वतीने या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करायला लावला.
मनपाचे जवळपास 70 पाण्याचे टँकर...
आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख स्वप्नील सरदार ,मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझण व अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न सुरू केले.
मनपा पाणी पुरवठा विभागाच्या वतीने जवळपास 70 टँकर अग्निशमन दलाच्या ६ अग्निशमन वाहनांच्या मदतीला पाठविण्यात आले.
सकाळ पासून या परिसरातील वाहतूक वळविण्यात आली होती. स्मार्ट सिटी कंट्रोल रूम येथून शहरात विविध 400 ठिकाणी बसविण्यात आलेले पब्लिक एड्रेस सिस्टीम (स्पीकर) द्वारे नागरिकांना या घटनेची माहिती देण्यात आली व त्यांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच याची माहिती जल बेल ॲप वर देखील देण्यात आली.
आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत हे या ठिकाणी सकाळ पासून घटना स्थळी तळ ठोकून होते.
पोलिस आयुक्त ,जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून मनपा आयुक्तांनी तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. या ठिकाणी जळगाव येथून रेस्क्यू टीम दाखल झाली आहे. तसेच एनडीआरएफचे पथक ,एलपीजी गॅस कंपनीचे पथक सुध्दा या ठिकाणी दाखल झाले आहे.
प्रशासनाच्या वतीने दुसऱ्या टँकर मध्ये अपघात ग्रस्त टँकर मधून गॅस भरण्यात आला. व टँकर पूर्ण खाली करण्यात येऊन सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
यावेळी घटना स्थळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, सौरभ जोशी, सहायक आयुक्त नईम अन्सारी, सविता सोनवणे, प्रसाद देशपांडे, मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झन झन, सुरे व संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित राहून प्रशासक महोदयांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम कामगिरी बजावली.
महानगरपालिकेच्या सुष्म नियोजनाने आज शहरावर आलेले संकट टळले आहे यांकरिता सर्व स्तरातून महानगरपालिकेचे कौतुक होत आहे. महानगरपालिकेची कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे हे आज नागरिकांनी अनुभवले आहे.
What's Your Reaction?